चाईल्ड लाईनने रोखला अल्पवयीन मुलीचा विवाह
बुलडाणा, दि. 20 - दहिद येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या संचालक जीजाताई चांदेकर यांना मिळताच त्यांनी अमोल पवार, राहुल दराखे, सरला मानवतकर यांना दहिदमध्ये रवाना केले. त्यांनी दहिद गाठुन पोलीस पाटील यांची भेट घेतली व त्यांना या प्रकराची माहिती देत त्यांच्यासह सदर मुलीचे घर गाठुन तीच्या आईशी चर्चा केली. आपल्या मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाले नसल्याची कबुली मुलीच्या आईने दिली. यावेळी चाईल्ड लाईनच्या चमुने त्यांना बाल विवाह कायदयानुसार अल्पवयीन मुलीचे लग्न करता येत नसल्याचे सांगीतले तसेच जबरदस्तीने अल्पवयीन मुलीचे लग्न केल्यास बाल विवाह प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सदर अल्पवयीन मुलीच्या पालकांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असे लेखी लिहुन दिले. त्यामुळे बालविवाह रोहखण्यात चाईल्ड लाईनला यश आले.