Breaking News

नगराध्यक्षपद वादाचा तब्बल दहा दिवसानंतर गुन्हा दाखल

अहमदनगर, दि. 08 - नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा विरोधात अविश्‍वास ठरावाच्या कारणावरून झालेल्या मारहाणी प्रकरणात भाजपा समर्थक चार नगरसेवकांसह दहा जणांविरोधात तब्बल दहा दिवसानंतर जामखेड पोलीसांत दरोड्यासह जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म अ‍ॅक्टनुसार  गुन्हे दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे जामखेड नगरपरिषदेचे  राजकीय वातावरण वादळी होण्याचे चिञ निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर असे कि, जामखेड नगर परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात असुन येथील प्रथम नगराध्यक्षा म्हणुन प्रिती राळेभात ह्या कारभार पाहत आहेत. नगराध्यक्षांच्या पतीच्या कारभाराला कंटाळून सत्ताधारी व विरोधी गटातील काही नगरसेवकांनी बंडाचा झेड फडकावत नगराध्यक्षांविरोधात अविश्‍वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली केल्या होत्या. या हालचालीला  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांचे निकालही काहीशी कारणीभूत ठरले होते. माजी मंञी सुरेश धस यांनी बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपाला केलेल्या उघड मदतीचा थेट परिणाम जामखेडच्या नगरपरिषदेत उमटले अन भाजपाच्या मदतीने नगराध्यक्ष बदलाच्या हालचालींनी उचल खाल्ली होती. त्यानुसार झालेल्या राजकीय हालचालीत 15 नगरसेवकांनी बंड पुकारले होते. हे नगरसेवक आठवडाभर आज्ञातवासात गेले होते.तेथुन परतलेले नगरसेवक  नगराध्यक्षांविरोधात अविश्‍वास ठराव दाखल करणार होते.माञ त्याच दिवशी राजकीय वादातून जामखेड मध्ये मोठी हाणामारीची घटना घडली होती.या घटनेत नगरसेवक गणेश आजबे जखमी झाले होते.तर दुसर्या गटातील प्रशांत जालिंदर राळेभात हाही जखमी झाला होता.त्याच्यावर सध्या अहमदनगरच्या नोबेल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. नगरसेवक गणेश आजबे यांच्या फिर्यादीवरून नगराध्यक्षांच्या पतीसह सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते तर आज दहा दिवसानंतर प्रशांत राळेभात यांच्या टपाली  फिर्यादीद्वारे  भाजपा समर्थक चार नगरसेवकांसह दहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
प्रशांत राळेभात यांनी दिलेल्या  फिर्यादीत म्हटले आहे की दि 29 मार्च रोजी रात्री 9. वा जामखेड शहरातील मेन पेठेतील काथवटे फोटो स्टुडिओ समोरून मोटारसायकलवरून जात असताना नगरसेवक गणेश आजबे यांनी आडवून डोक्यास रिव्हॉल्व्हर लावून नगराध्यक्ष पदाच्या अविश्‍वास ठरावामध्ये हस्तक्षेप का करतो. तू जर पून्हा भाग घेतला तर तुझा काटा काढीन अशी धमकी दिली यावेळी आरोपी नं दोन यांनी लाथा बुक्यांनी मारहाण करून खिशातील 44 हजार रुपये काढुन घेतले असे फिर्यादीत म्हटल्यानूसार नगरसेवक गणेश उत्तम आजबे, सोमनाथ मच्छिंद्र राळेभात, सचिन आजबे, दिगांबर आजबे, दिगांबर आजबे यांचा जावाई (नाव माहीत नाही), नितीन दत्तात्रय आजबे, शामीर लतीफ सय्यद, महेश भारत निमोणकर, अमित अरूण चिंतामणी, तुषार दिनेश पाटील, सर्व रा जामखेड यांच्याविरुद्ध दरोडा आर्म अ‍ॅक्ट जीवे मारण्याची धमकी यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी टपालाद्वारे आलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे हे करत आहेत.