Breaking News

अवाजवी दरवाढ करणार्‍या सिमेंट कंपनी मालकांना तुरुंगात टाकू : गडकरी

नागपूर, दि. 30 - अवाजवी दरवाढ करणार्‍या सिमेंट कंपनीच्या मालकांना तुरुंगात टाकू, असा सज्जड दम केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. दरवाढ नियंत्रणात नाही ठेवली तर बंद झालेल्या सरकारी सिमेंट कंपन्या पुन्हा सुरु करु, असंही गडकरी म्हणाले. उद्योगात नफा कमावणं स्वाभाविक असलं तरी ज्याप्रकारे सिमेंटचे दर वाढवून लोकांना वेठीस धरलं जातं, ते खपवून घेतलं जाणार नाही, असंही नितीन गडकरी म्हणाले.  नागपूरच्या मिहान येथे किशोर बियाणींच्या फ्युचर समूहातर्फे उभारण्यात आलेल्या प्रकल्पाचा भाग असलेल्या क्रॉस बेल्ट सॉर्टेशन सिस्टिमचं उदघाटन गडकरींच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
दरवाढ नियंत्रणात ठेवली नाहीत, तर रस्ते बांधताना बंद केलेल्या सरकारी सिमेंट कंपन्या परत सुरु करु आणि तिथूनच सिमेंट विकत घेऊ, असा इशारा गडकरींनी सिमेंट कंपनीच्या मालकांना दिला. रस्ते बांधकाम आणि इतर प्रकल्पांचे काम देशात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ते पूर्ण होण्यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. असं असूनही या कंपन्यांनी सिमेंटच्या किमती वाढवल्या असून त्या मागे घ्याव्या ही मागणी गडकरींनी केली. तसं न झाल्यास सिमेंट
कंपन्यांच्या मालकांना तुरुंगवास घडेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशात सरकारच्या मालकीचे 10 सिमेंट कारखाने बंद स्वरुपात आहेत. हे सर्व कारखाने आपण सुरु करु आणि सर्वसामान्यांना स्वस्त दारात सिमेंट उपलब्ध करुन देऊ, असंही गडकरींनी सांगितलं.