Breaking News

भीमाकाठी वाळू माफियांवर धडक कारवाई, 40 लाखांची वाळू जप्त

पंढरपूर, दि. 30 - पंढरपूर तालुक्यातील शेगावदुमाला येथून जवळपास 40 लाख रुपये किंमतीचा एक हजार ब्रास वाळूसाठा पोलिस आणि महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईमध्ये जप्त करण्यात आला. अजूनही शेतातून मोठ्या प्रमाणात छापेसत्र सुरु आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सध्या बेकायदा वाळू उपसा विरोधात धडक मोहीम सुरु केली आहे. यातूनच या गावावर ही कारवाई शनिवारी पहाटे करण्यात आली.
शेगाव दुमाला या गावात घरोघरी बेकायदा वाळू उपसा करून रोज हजारो रुपयांच्या वाळूची चोरी होत असल्याची माहिती पिंगळे याना लागताच, त्यांनी पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या पथकाला या ठिकाणी भल्या पहाटे कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार गावाला कळायच्या आताच पोलिसांनी छापे टाकीत गावभर असलेले वाळू साठे जप्त करण्यास सुरुवात केली. याची माहिती महसूल विभागाला दिल्यानंतर तहसीलदार अनिल कारंडे आणि त्यांचे पथक याठिकाणी दाखल होत महसुली कारवाईस सुरुवात झाली. आजची कारवाई ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असून, आतापर्यंत जवळपास 40 लाखांचे वाळू साठे जप्त केले आहेत. पिंगळे यांच्या या धडक कारवाईमुळे वर्षानुवर्षे चोरटी वाळू उपसा करणार्‍या वाळू माफियांना मोठा तडाखा बसला असून आता संबंधित शेतकर्‍यांच्या जमिनीवर बोजा चढविण्याची कारवाई महसूल प्रशासन करणार आहे. हे वाळूचे साठे हलवण्यासाठी प्रशासनाने अनेक गाड्या आणि जेसीबी यंत्रे शेगाव दुमालात आणली असून पोलीस बंदोबस्तात वाळू हलवायचे काम सुरु करण्यात आले आहे.