Breaking News

डॉ.आंबेडकर जयंती मिरवणुकीत डिजेचा दणदणाट ; 14 जणांवर गुन्हा

अहमदनगर, दि. 17 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी  जयंतीच्या निमित्ताने अहमदनगर शहराच्या प्रमुख भागातून मिरवणुक काढण्यात आली होती.  यामध्ये विविध संघटना, मंडळे आदि सहभागी झाले होते. या मिरवणुकीमध्ये डिजे जावून नियमाचे उल्लंघन केले, मोठ्या आवाजात डी. जे. वाजविला व ध्वनीप्रदुषण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सुरेश बनसोडे यांच्यासह 14 जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश बांगरे, अंकुश मोहिते, अमर साहेबराव शिंदे, राजेंद्र महेंद्र शेलार, शाहरुख महंमद शेख आदींच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, नगर शहरात डॉ. आंबेडकर यांची जयंती हेाती या जयंतीनिमित्ताने सात मंडळांनी मिरवणुकीत सहभाग नोंदविला होता. मिरवणुकीत मोठ्या आवाजात डी. जे. वाजवू नये असे जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने सूचित करण्यात आले होते. मात्र, मंडळाच्या आयोजकांनी नियमाचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणावर डी. जे. वाजवून ध्वनीप्रदुषण केले. या घटनेची गंभीर दखल घेत कोतवाली पोलीसांनी सुरेश बनसोडे यांच्यासह 14 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सहा. पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत यांनी सुरेश बनसोडे यांना मिरवणुकीत डी. जे. चा आवाज कमी करण्यास सांगितले होते. मात्र, पंडीत यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने डी. जे. जप्तीची कारवाई करण्यात आली. मिरवणूक नेताजी सुभाष चौकात आल्यानंतर पोलीस उपअधिक्षक तानाजी बर्डे, पो. नि. सोमनाथ मालकर, पो. नि. नारायण वाखारे, सहा. पो. नि. राहुल पाटील, पो. उपनिरीक्षक गजानन करेवार यांनी डी. जे. जप्तची कारवाई केली.