Breaking News

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मनोज सिन्हा सर्वात पुढे !

लखनौ, दि. 17 - उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याबाबत भाजपकडून अद्याप गुप्तता पाळण्यात आली आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, लखनौमध्ये 18 मार्चला होणार्‍या आमदारांच्या बैठकीत उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य हे मुख्यमंत्रिपदासाठी मनोज सिन्हा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवतील. निरीक्षक म्हणून नेमणूक झालेले व्यंकय्या नायुडू आणि भूपेंद्र यादव हे मनोज सिन्हा यांच्या नावावर आमदारांची संमती घेतील आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना त्याबाबत माहिती देतील. त्यानंतर अमित शाह स्वत: मनोज सिन्हा यांच्या नावाची घोषणा करतील.
उत्तर प्रदेशात भाजपने मोठा विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत चर्चा सुरु झाल्या. मात्र, एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार मनोज सिन्हा हेच या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. मनोज सिन्हा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचे निकटवर्तीय मानले जातात. केंद्रीय मंत्र्यांनीही मनोज सिन्हा यांच्या नावावर संमती दर्शवली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, उमा भारती, डॉ. महेश शर्मा, महेंद्र पांडे यांनीही सिन्हांच्या नावाला समर्थन दिलं आहे. केंद्रीय मंत्रिमंळात मंत्री म्हणून मनोज सिन्हा यांचं काम उत्तम असल्याचं मानलं जातं आहे. मनोज सिन्हा आतापर्यंत तीनवेळा गाजीपूरमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत.