Breaking News

मार्डचे डॉक्टर चौथ्या दिवशीही सामूहिक रजेवर

मुंबई, दि. 23 - मार्डच्या डॉक्टरांचं काम बंद आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरुच आहे. मार्डच्या डॉक्टरांचं आंदोलन संपलं असा दावा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी काल बुधवारी केला होता, तरीही मार्ड आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे डॉक्टरांचं आंदोलन आता जास्त चिघळण्याची शक्यता आहे.
बुधवारी रात्री सायन रुग्णालयामधील बालरोग तज्ज्ञ डॉ. मानसी यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या निषेधार्थ काल रात्रीपासून पुन्हा डॉक्टरांनी आपलं आंदोलन तीव्र केलं आहे. सायन रुग्णालयाबाहेर डॉक्टरांनी धरणं आंदोलन सुरु ठेवलं आहे. ‘राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतलं आहे,  (22 मार्च) रात्री 8 वाजता डॉक्टर कामावर रुजू होणार असल्याचं आश्‍वासन ‘मार्ड’नं दिलं आहे.’ असा दावा गिरीश महाजन यांनी केला होता.
डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी आज माझ्याशी याबाबत चर्चा केली. तसेच त्यांच्या मागण्याही त्यांनी माझ्यासमोर मांडल्या. त्यांच्या सगळ्या मागण्या मी मान्य केल्या आहेत. त्यांची सुरक्षेविषयीची प्रमुख मागणी आणि इतर मागण्याही आम्ही मान्य केल्या आहेत. त्यानंतर डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी आपण संप मागे घेत असल्याचं मला सांगितलं, अशी माहिती महाजन यांनी बुधवारी दिली होती.
एकीकडे गिरीश महाजन यांनी संप मागे घेतल्याचा दावा केला असला तरी अनेक ठिकाणी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन सुरुच आहे. त्यामुळे आता सरकार आणि मार्डमधील तिढा आणखी वाढला आहे. ‘जर डॉक्टर कामावर रुजू झाले नाही तर मात्र, त्यांना परिणामांना सामोरं जावं लागेल. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.’ असं महाजन म्हणाले होते.