Breaking News

पाचपैकी चार राज्यात भाजपची सत्ता, मणिपूरमध्येही बहुमत सिद्ध

इंफाळ, दि. 20 - गोव्यानंतर भाजपने मणिपूरमध्येही बहुमत सिद्ध केलं आहे. 60 सदस्यसंख्या असलेल्या मणिपूर विधानसभेत भाजपला 33 सदस्यांनी पाठिंबा दिला. भाजपचे यमनम खेमचंद यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे एन बिरेन सिंह यांनी 16 मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मणिपूरमध्ये पहिल्यांदाच भाजप सरकार स्थापन झालं आहे. एक अपक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या एका आमदारानेही भाजपला पाठिंबा दिला.
मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्यासह भाजपच्या दोन आमदारांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. तर एनपीपी 4, एनपीएफ, एलजेपी प्रत्येकी एक आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या एका आमदाराला मंत्रिपद दिलं आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत 21 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेस 28 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र भाजपने अन्य पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली.
11 मार्च रोजी पाच राज्यांच्या निकाल लागल्यानंतर चार राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होईल, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितलं होतं. गोवा आणि मणिपूरमध्ये संख्याबळ कमी असतानाही भाजपने अन्य पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली. तर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने बहुमताने सरकार स्थापन केलं.