Breaking News

स्वतःच्या रक्ताचे झाले नाहीत, त्यांनी विश्‍वासघातकी म्हणू नये : धस

पुणे, दि. 23 - जे स्वतःच्या रक्ताचे झाले नाहीत, ज्यांनी स्वतःच्या काकांचा विश्‍वासघात करुन परळी नगरपरिषद जिंकली, त्यांनी ‘विश्‍वासघातकी’ हा शब्द वापरु नये, असा पलटवार राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांनी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. ‘भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या सुरेश धस यांच्या स्वभावातच विश्‍वासघातकीपणा आहे. त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी कारवाई करावी’, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवरच शरसंधान साधलं. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे उमेदवार पाडण्यासाठी कुणी प्रयत्न केले, कुणी पैसे पुरवले, याची माहिती पक्ष नेतृत्वाने घ्यावी, असं सुरेश धस यांनी सुचवलं. जे स्वतःच्या रक्ताचे झाले नाहीत, ज्यांनी स्वतःच्या काकांचा विश्‍वासघात करुन परळी नगरपरिषद जिंकली, त्यांनी ‘विश्‍वासघातकी’ हा शब्द वापरु नये, अशी बोचरी टीका धस यांनी केली.
माझ्यावर जी काय कारवाई करायची, ते पवार साहेब (शरद पवार) आणि अजित दादा ठरवतील. धनंजय मुंडे माझ्यानंतर पक्षात आले आहेत. त्यांनी माझ्यावर कारवाई करावी असं सांगू नये, असं सुरेश धस म्हणाले. मी आजही राष्ट्रवादीसोबत आहे आणि उद्याही राष्ट्रवादीसोबत असेन, असंही यावेळी सुरेश धस यांनी स्पष्ट केलं. विश्‍वासघातकी कोण आहे, दगाबाज कोण आहे, हे अख्ख्या बीड जिल्ह्याला माहित आहे. जे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत पाच हजार वेळा खोटं बोलतात त्यांनी विश्‍वासघातकी शब्द वापरु नये, असे बेधडक आरोपही सुरेश धस यांनी केले.
अजित पवारांनी माझ्याविरोधात फेसबुकवर लिहिलं असेल, असं वाटत नाही. अजित दादा सरळ आहेत.  त्यांच्या नावानी ‘यांनी’च लिहिलं असेल, असा टोलाही सुरेश धस यांनी हाणला. माझा वाद जे स्वतःच्या रक्ताचे झाले नाहीत, त्यांच्याशी आहे, पवार साहेब आणि अजित पवारांसोबत नाही, असंही सुरेश धस यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर, सोलापूर, नाशिकमध्ये भाजपसोबत गेली, मग बीडमध्ये भाजपसोबत गेल्यावरच अशी काय आणीबाणी निर्माण झाली? असा सवालही धस यांनी उपस्थित केला.