Breaking News

मनोज म्हात्रे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी, चुलतभाऊ अटकेत

भिवंडी, दि. 30 - भिवंडी काँग्रेसचे नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. प्रशांत भास्कर म्हात्रे असं आरोपीचं नाव असून त्याला पाचगणीहून अटक करण्यात आली आहे.
प्रशांत भास्कर हा मनोज म्हात्रेंचा चुलतभाऊ आहे, विशेष म्हणजे तो भाजपचा पदाधिकारी आहे. प्रशांत भास्कर म्हात्रेसह 4 आरोपींनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ठाण्याच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. अटकेत असलेल्या एकूण आरोपींची संख्या 13 वर गेली आहे.
14 फेब्रुवारीला मनोज म्हात्रे यांच्यावर गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्रानं वार करत त्यांची हत्या करण्यात आली होती. मनोज म्हात्रे हे भिवंडीतील अंजूरफाटा परिसरात राहत होते. काही कामानिमित्त ते त्यांच्या इमारतीखाली आले असताना दोघांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. एकाने म्हात्रेंवर गोळ्या झाडल्या, तर दुसर्‍याने कोयत्याने वार केले. जखमी अवस्थेतच त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथं त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मनोज म्हात्रे हत्या प्रकरणातील सूत्रधार प्रशांत म्हात्रेसह 19 आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.