Breaking News

भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड कमावलं, गोवा मात्र गमावलं

पणजी, दि. 12 - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड भाजपने जिंकलं असलं तरी गोवा मात्र गमावलं आहे. कारण इथे काँग्रेस मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे गोव्यात भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. एकूण 40 जागांपैकी भाजप 13, काँग्रेस 17, आप 0, गोवा सुरक्षा मंच 3 आणि इतर 7 असं गोवा विधानसभेचं पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे भाजप सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. मनोहर पर्रिकर यांनी तसे संकेतही दिले आहेत.
गोव्यात अनेक गोष्टी भाजपाला भोवल्या. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर दिल्लीला गेल्यावर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर  खंबीर नेतृत्व देऊ शकले नाहीत. पर्रिकरांचा त्यामुळे एक पाय दिल्लीत आणि एक पाय पणजीत राहीला. परिणामी त्यांनी गोव्यात भाजपमागे मुश्किलीने उभी  केलेली बहुभाषिक आणि बहुधार्मिक मतदारांची फळी तुटली.
गोव्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात बंडाळी झाली. गोव्याचे प्रांतप्रमुख सुभाष वेलिंगकरांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर राजकीय युद्ध  भाजपाविरुद्धच पुकारलं. परिणामी गोवन आणि मराठी मतदार विरोधात गेला. वेलिंगकरांनी उभारलेल्या आघाडीमुळे अनेक ठिकाणी भाजपाचे उमेदवार पडले. अशा  निर्णायकी परिस्थितीत दिल्लीवरून गोव्याला नेतृत्व दिलं जाईल हे अमित शाहांचं विधान काही गोवेकरांच्या गळी उतरलं नाही. त्यामुळे गोव्यावरची भाजपाची पकड  बघता बघता सुटत गेली.
दुसर्‍या बाजूला गेल्या वेळेस भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून सत्ता गमावलेली काँग्रेस सोडून गोवेकरांकडे दुसरा पर्यायही उरला नाही. कोणत्याही प्रकारचं आक्रम कॅम्पेन न  करताही गोव्यात काँग्रेसला फायदा झाला. ‘आप’ने एल्विस गोम्स यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून वातावरण निर्मिती केली खरी, कैथलिक मतं  आपल्याकडे खेचण्याचा एक चाणाक्ष प्रयत्न करून पाहीला, पण गोव्याने आपकडे ढुंकूनही पाहिलं नाही आणि त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही.