Breaking News

महाराष्ट्राच्या सुपुत्रासह सर्जिकल स्ट्राईकच्या हिरोंना शौर्य पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 21 - पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करणार्‍या नायकांचा शौर्य पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सर्जिकल स्ट्राईकचं नेतृत्व करणार्‍या मेजर रोहित सुरी यांचा कीर्तीचक्र देऊन सन्मान करण्यात आला. तसंच यावेळी महाराष्ट्राचे लेफ्टनंट जनरल सुपुत्र राजेंद्र निंभोरकर यांचाही गौरव केला. सर्जिकल स्ट्राईकचं नेतृत्व करणार्‍या मेजर रोहित सुरींना देशातील दुसर्‍या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते मेजर सुरी यांना कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. तर लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना उत्तम युद्ध सेवेचं मेडल प्रदान केलं.
पठाणकोट हल्ल्यात दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलेले भारतीय वायूसेनेचे अधिकारी गुरसेवक सिंह यांना मरणोत्तर शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती भवनात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.
उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन, 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला.  भारतीय लष्कराच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती आज महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली.
दहशतवादी एलओसी पार करुन भारतात घुसण्याच्या तयारीत होते. मात्र त्याची कुणकुण भारताला लागली. भारतीय जवानांनी थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचा खात्मा केला, असं रणबीर सिंह म्हणाले. इतकंच नाही तर भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचंही रणबीर सिंह यांनी ठणकावून सांगितलं. घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केले. यामुळे शत्रूचं मोठं नुकसान झालं. आमच्या सर्जिकल स्ट्राईकचा उद्देश केवळ दहशतवाद्यांना मारणं हेच होतं, जे सीमेवरुन भारतात घुसण्याचा प्रयत्नात होते. आम्हाला हे जास्त वाढवायचं नाही, असं रणबीर सिंह म्हणाले. यावेळी रणबीर सिंह यांनी भारताकडून सर्जिकल स्ट्राईक्स केल्याचं सांगितलं. तसंच या सर्जिकल स्ट्राईक्सची माहिती लष्कराने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती, जम्मून काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना दिली होती, असं रणबीर सिंह यांनी सांगितलं.