Breaking News

आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी आता शिवसेना मैदानात !

मुंबई, दि. 23 - अर्थसंकल्प सादर करत असताना विधानसभेत गोंधळ घालणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 19 आमदारांचं काल निलंबन करण्यात आलं. या निलंबित आमदारांवरील निलंबानाची कारवाई मागे घ्यावी, यावर शिवसेना आमदारांनी चर्चा केली. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आदेश आल्यानंतर सेना आमदार मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करण्याची शक्यता आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर सभागृहात काय भूमिका घ्यायची, यावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 19 आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यावर शिवसेना आमदारांच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यानंतरच शिवसेनेचे सर्व आमदार मुख्यमंत्र्यांना भेटून 19 आमदारांचं निलंबन मागे घ्या, अशी मागणी करण्याची शक्यता आहे. सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे  असे आरोप ठेवून 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलं.