Breaking News

वाई हत्याकांडातील ज्योती मांढरे माफीचा साक्षीदार होण्याची शक्यता

सातारा, दि. 13 (प्रतिनिधी) : वाईमध्ये सहा जणांचा खून केल्याप्रकरणी कळंबा कारागृहात असलेल्या संतोष पोळ याला अ‍ॅड. श्रीकांत हुटगीकर यांनी अतिरिक्त  जिल्हासत्र न्यायाधीश डी. डब्ल्यु. देशपांडे यांच्या कोर्टात पोळच्या वतीने वकीलपत्र दाखल केले. याप्रकरणातील संशयित सहअरोपी असलेली ज्योती मांढरे हिला  मंगल जेधे खून प्रकरणात माफीचा साक्षीदार करण्यात यावे, असा विनंती अर्ज सरकार पक्षातर्फे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी  केला आहे. आता या अर्जावर 23 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे संशयित आरोपी संतोष पोळ याला न्यायालयात हजर करण्याच्या सुचना  न्यायालयाने पोलिसांना दिल्या आहेत. तर संतोष पोळचे वकील श्रीकांत हुटगीकर त्या दिवशीच पोळचा जामीन अर्ज न्यायालयास सादर करणार आहे.
सरकार पक्षाच्यावतीने यापुर्वीच अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची या खटल्यात सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 11 ऑगस्ट 2016 रोजी संतोष  पोळ याने अंगणवाडी सेविका संघटनेच्या कार्यकर्त्या मंगल जेधे हिचा खून केल्याचे निष्पन्न झाले. तेव्हांपासून पोळला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याची चौकशी  केली असता पोळ याने आणखी 5 खुनाची कबुली दिली.
सुरेखा चिकणे (20 मे 2003), वनिता गायकवाड (12 ऑगस्ट 2006), जगाबाई पोळ (13 ऑगस्ट 2010), नथमल भंडारी (7 डिसेंबर 2015), सलमा शेख  (17 जानेवारी 2016) यांचा खून करण्यात आला होता. यापैकी मंगल जेधे, सलमा शेख व नथमल भंडारी या तीन खून प्रकरणांचा खटला सातारा जिल्हा सत्र  न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे. तर अन्य तीन खुनांचे खटले लवकरात लवकर वर्ग करण्यात येणार आहेत. संतोष पोळ याची सहकारी ज्योती मांढरे  हिच्यामुळेच खुनांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीपासून ज्योती मांढरेवर लक्ष केंद्रीत केले असून तिला याप्रकरणात  माफीचा साक्षीदार करण्याचे ठरले आहे.
 ज्योती मांढरे ही सध्या सातारा कारागृहात असून तपासी अधिकार्‍यांनी ज्योती हिला माफीचा साक्षीदार करावे, म्हणून न्यायालयाकडे विनंती अर्ज केला आहे. या  अर्जावर दि. 23 रोजी सुनावणी होणार आहे. संतोष पोळ याच्या जामीनासाठी त्याचदिवशी अर्ज करणार आहे.