Breaking News

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आदर्श आचारसंहितेचे पालन करावे अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे

पुणे, दि. 13 - राज्य निवडणूक आयोगाने पुणे जिल्हा परिषदेच्या 75 गट व 150 गणांचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार संपूर्ण जिल्हयात  आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सदर आदर्शआचार संहितेचे पालन सर्व संबधितानी कटाक्षाने करावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश  काळे यांनी आज येथे केले.
आदर्श आचारसंहितेची माहिती देण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची  बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपस्थित  राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीला निवडणूक समन्वय अधिकारी तथा रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी विक्रांत  चव्हाण, तहसीलदार महेश पाटील उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाने 14 ऑक्टोबर,2016 रोजीच्या परिपत्रकान्वये आदर्श आचार संहितेचा मसूदा जाहिर केला आहे. यामधील तरतूदींचे पालन करणे सर्वांना  बंधनकारक असल्याचे यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी सांगितले. बैठकीला उपस्थित विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आदर्श आचारसंहिता  व निवडणूकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नांसंदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली.
बैठकीला विविध पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व  संबधित अधिकारी उपस्थित होते.