Breaking News

कराड तालुक्यातील धोंडेवाडीच्या अंगणवाडीला केंद्रिय समितीची भेट

कराड, दि. 20 (प्रतिनिधी) : शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो, असे म्हटले जाते. परंतू ते शिक्षण दर्जेदार माणूस घडवणारे असले पाहिजे, शिक्षणाचा पाया मजबूत  हवा. याचाच एक भाग म्हणून शासनाने शिक्षणाची पहिली पायरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या अंगणवाडीकडे लक्ष दिले आहे. अंगणवाडीचा प्रत्येक घटक महत्त्वपूर्ण  मानून अंगणवाड्यांना शिक्षणाबरोबर हायटेक करण्याचा प्रयत्न करत आहेत. कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथील हायटेक अंगणवाडी म्हणून ग्रामपंचायतीचा  समावेश झाला आहे. या अंगणवाडीस केंद्रिय समितीने भेट देवून कामकाज पाहून समाधान व्यक्त केले.
गावातील मुलानी गावातच शिक्षण घेतले पाहिजे. स्पर्धेच्या युगात खेड्यातील मुलांकडे दुर्लक्ष होता कामा नये. खेड्यातील शिक्षणाचा पाया म्हणून संबोधल्या  जाणार्‍या अंगणवाड्या सज्ज असल्या पाहिजेत. शिक्षणाबरोबरच मुलांना विविध बाबीचे ज्ञान मिळाले पाहिजे. मानांकन मिळण्यासाठी अगंणवाडीतील हायटेक  अंगणवाडीच्या यादीत समावेश, शिक्षणाचा स्तर उंचावला विविध माहिती पत्रके, भिंत्तीपत्रके, शाळेतील आहाराचा दर्जा, पाण्याची सोय, दैनंदिनी, आहाराचे  वेळापत्रक, स्वच्छता, पालकांमध्ये जागृती, मुलांची प्रगती याबाबी तपासल्या जातात. सन 1975 मध्ये एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत शासनाने अंगणवाड्या  सुरू केल्या. त्यावेळी मुख्य उद्देश बालकामधील कुपोषणाशी लढा देणे असा होता. परंतू हळूहळू अंगणवाड्यांचा विविध स्तरावर विस्तार झाला. आज महाराष्ट्रात  एक लाखापेक्षा जास्त अंगणवाड्या व मिनी अंगणवाड्या आहेत. तर 550 पेक्षा जास्त एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प सुरू आहेत. दोन लाखाहून अधिक  अंगणवाडी सेविका व मदतनीस काम करत आहेत.
मुलांच्या शिक्षणाचा महत्त्वपूर्ण पाया म्हणून अंगणवाडीकडे पाहिले जाते. अंगणवाडीचा दर्जा सुधारणे, स्पर्धेच्या युगात अंगणवाड्या सक्षम करणे, मुलांना खासगी  शाळेत जाण्यापासून परावृत्त करणे तसेच अंगणवाड्या सक्षम करणे याचा मुख्य उद्देश आहे. त्याकरता आयएसओ मानांकन देण्याचे शासनाने ठरविले आहे. सातारा  जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांनी आयएसओ मानांकन मिळवले असून काही अंगणवाड्या त्या शर्यतीत आहेत. कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथील नवीन  अंगणवाडी सध्या आयएसओ मानांकन मिळण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. नुकतीच केंद्रीय समितीने अंगणवाडीच्या कामकाजाची पाहणी करून समाधान  व्यक्त केले. अंगणवाडी हायटेक करण्यासाठी प्रकल्प अधिकारी प्रतिभा लोंढे, पर्यवेक्षिका पल्लवी पाटील, सेविका अस्मिता गोरे, मदतनीस नंदा मोरे, गावचे  सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी अंगणवाडीच्या विकासासाठी सहकार्य केल्यामुळे अंगणवाडीच्या कामकाजात चांगले बदल झाले आहेत.