Breaking News

पुण्यात मनसेच्या बैठकीत शिवसेनेसोबत युतीबाबतचीच चर्चा

पुणे, दि. 29 - महापालिका  निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेने सोबत युती करावी का यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, कार्यकर्ते यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती कळत आहे. या बैठकीत वरिष्ठ नेत्यांसह सर्वांची मते घेतली असून हा अभिप्राय मुंबईला पाठवण्यात आला आहे. 
यासंदर्भात अंतिम निर्णय मुंबईवरूनच होणार आहे. दरम्यान, असे असले तरी अनेकांनी युती व्हावी अशीच अपेक्षा केली आहे. शिवसेना नसेल तर भाजप सोबत युती करावी अशी चर्चा झाल्याची देखील माहिती मिळत आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे एकत्र यावे, अशी सर्वांची इच्छा असल्याचे बोलून दाखवले होते. ते दोघे एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात इतिहास घडेल. मात्र, त्यासाठी दोघांची इच्छा असणे महत्वाचे आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर आजच्या या बैठकीस महत्व प्राप्त झाले आहे.