Breaking News

मुंबई पोलिसांची आजपासून 8 तास ड्युटी

मुंबई, दि. 01 - नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई पोलिसांची ड्युटी 8 तास करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकरांनी हा निर्णय घेत मुंबई पोलिसांना नवीन वर्षाचं गिफ्ट दिलं आहे. सोबतच मुंबई पोलिस दलात काही महत्वाचे बदलही केले जाणार आहेत.
मुंबई पोलिसांवर कामाचा मोठा ताण आहे. दिवसातून 15 ते 16 तास काम करणार्‍या मुंबई पोलिसांना यापुढे आठ तासांची ड्युटी करावी लागणार आहे. तसंच मुंबई पोलिसांच्या अखत्यारितील काही कक्षही कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहेत. यात प्रामुख्यानं गुन्हे शाखेचा खंडणी विरोधी कक्ष, मालमत्ता कक्ष, वाहनचोरी विरोधी कक्ष, सोनसाखळी चोरी विरोधी कक्ष, सीआययू विभागाचं लॉजिस्टीक युनीट, तसंच दोन सशस्त्र बल गट कायमस्वरुपी बंद होणार आहेत.
मुंबई पोलिसांना 15 ते 16 तासांच्या ड्युटीसोबतच अनेकवेळा त्यापेक्षा जास्त काम करावं लागतं. तसंच व्हीव्हीआयपी बंदोबस्तासाठी पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द केल्या जातात. याच पार्श्‍वभूमीवर देवनार पोलिस ठाण्यातील एका पोलिस शिपायानं आयुक्तांना 73 पानी पत्रही लिहिलं होतं. या पत्राची दखल घेत पोलिस आयुक्तांनी आजपासून मुंबई पोलिसांच्या ड्यूटीत बदल केला आहे.