Breaking News

अहमदनगरमध्ये निवडणुकीच्या बंदोबस्तावरील पोलिसाला मारहाण

अहमदनगर, दि. 26 -  अहमदनगर जिल्हातल्या पाथर्डीत निवडणुकीच्या बंदोबस्तावरील पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत महादेव शिंदे हे जखमी झाले आहेत. रांगेत उभे राहण्यास सांगितल्याने पोलिसाला खाली पाडून जमावाने बेदम मारहाण केली आहे.
अल्हनवाडी सोसायटीच्या मतदानावेळी रविवारी पोलिसाला मारहाण करण्यात आली आहे. पाथर्डीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान सुरु होते. त्यावेळी  मतदान टेबलाजवळील गर्दीला रांगेत उभे राहण्यास सांगितल्याने वाद झाला होता. वादानंतर गर्दीतील अज्ञाताने शिंदे यांचा हात धरुन शिवीगाळ करण्यास सुरुवात  केली. त्यानंतर दहा ते पंधरा जणांच्या जमावाने शिंदेंना खाली पाडून लाथाबुक्यांनी पोटावर आणि छातीवर बेदम मारहाण केली. या प्रकरणी पाथर्डी पोलीस  ठाण्यात 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अजून कोणालाही अटक करण्यात आली नाही.