दाक्षिणात्य लढाईत बुल्सची बाजी
![]() |
पंचाच्या निर्णयाविरूद्ध टायटन्सची नाराजी
हैदराबाद, दि. 06 - प्रो कबड्डी लीगमध्ये काल झालेल्या हैद्राबाद लीगच्या तीसर्या दिवशी बेगळुरू बुल्सने तेलगू टायटन्सचा 2 गुणांनी पराभव करीत तीसर्या विजयीची नोेंद केली. दरम्यान ‘वादविरहित स्पर्धा’ असे बिरूद मिरवणार्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील तेलुगू टायटन्स आणि बंगळुरू बुल्स हा दाक्षिणात्य मुकाबला वादाच्या भोवर्यात सापडला. सामना संपण्यासाठी निर्धारित वेळेची मर्यादा बाकी असतानाही पंच दामोदर यांनी आमची चढाई रोखली आणि म्हणूनच पराभवाला सामोरे जावे लागले, अशी थेट टीका हैदराबाद संघाने केली.पंच दामोदर यांच्यामुळेच आतापर्यंत तीन सामने गमावले आहेत, अशी टीका टायटन्सच्या प्रशिक्षकांनी केली. दामोदर यांच्याविरोधात अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केली. दरम्यान, वादाने शेवट झालेल्या या लढतीची सुरुवातही वादग्रस्त झाली होती. हैदराबाद संघाने बंगळुरूच्या रोहित कुमारने मलम लावल्याची तक्रार केली. पंचांनी रोहितच्या पायाची तपासणी केली. मात्र काहीही आक्षेपार्ह न आढळल्याने त्यांनी रोहितला खेळण्याची अनुमती दिली. एकूणच विशिष्ट पंचांमुळे पराभव होत असल्याच्या टीकेमुळे मोठया वादाला तोंड फुटले आहे.
या सामन्यात दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. मध्यंतराला बंगळुरूकडे 16-11 अशी आघाडी होती. उत्तरार्धात राहुल चौधरीने सलग दोन चढायांत संघाला दोन गुण मिळवून दिले आणि गुणसंख्या 22-30 झाली. बंगळुरूचा आधारस्तंभ असलेल्या रोहित कुमारची पकड करत टायटन्सने एक गुण मिळवला. राहुल चौधरीच्या चढाईसह टायटन्स संघाने बंगळुरूवर लोण चढवला आणि 26-30 अशी पिछाडी भरून काढली. नीलेशने गुण पटकावला आणि टायटन्सने 27-30 अशी आगेकूच केली. शेवटच्या मिनिटांमध्ये टायटन्सची 28-30 अशी स्थिती असताना बंगळुरूच्या पवन कुमारची पकड झाली आणि उरलेली पिछाडी भरुन काढण्यासाठी टायटन्सचा कर्णधार राहुल चौधरीने उतावीळपणे चढाईला सुरुवात केली. मात्र बाद झालेला बंगळुरूचा पवन कुमार बाहेर जाण्याआधी निर्धारित वेळ संपली. मात्र तरीही राहुल चौधरीने चढाई करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न पंच आणि बंगळुरूच्या खेळाडूंनी रोखला.
