Breaking News

प्रादेशिक पक्ष संपवण्याचा भाजपचा डाव!

भारतीय जनता पार्टी अर्थात भाजपा सत्तेत येऊन आता उणीपुरी दोन वर्ष पुर्ण झाली आहे. या दोन वर्षात बरीच उलथापालथ झाली असून, भाजपाचे पुढील राजकारण कसे असेल याचे संकेत या 2 वर्षात बघायला मिळायला आहेत. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करतांना आपला मित्रपक्ष शिवसेना ला बाजूला सारून राष्ट्रवादी काँगे्रसचा पाठिबां घेवून सत्ता स्थापन केली, तेव्हाही शिवसेनाला अपमानास्पद वागणूक देण्याचा भाजपाने प्रयत्न केला. तेव्हापासून ते आजपर्यंत भाजपा व शिवसेनेने एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही. मात्र शिवसेनेच्या होणार्‍या हल्लयामुळे भाजपा आपली मानसिकता हरवून बसला आहे. खिलाडूवृत्ती, निकोप राजकारण, मित्रपक्ष, या संकल्पना बासनात गुंडाळून, प्रादेशिक पक्षाला चीत करण्याची एकही संधी भाजपाकडून सोडण्यात येत नाही. भाजपाच्या फेसबुक पेजवर शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. देश पिताश्रींच्या पुण्याईवर चालत नाही, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिग्विजय सिंह, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे एकाच माळेचे मणी असल्याची टीका केली आहे. सत्ता मिळाल्यानंतर त्याचा उपयोग जो जनतेच्या लोकाभिमुख कारभारासाठी करतो, तो लोकांच्या मनात नेहमीच घर करून राहतो, मात्र खिलाडूवृत्ती निकोप राजकारणाला बगल देवून सत्तेचा गाडा हाकलणारे जास्त दिवस सत्तेवर राहत नाही, हा सर्वांना माहीत असलेला संकेत आहे. पण सत्तेच्या जोरावर प्रादेशिक सरकार उलथून टाकण्याचे मनसुभे भाजपाने आखलेले दिसतात. उत्तराखंड, अरूणाचल प्रदेश यासारख्या राज्यातील घडोमोडींवर नजर ठेवून, केंद्रातील सत्तेच्या जोरावर प्रादेशिक पक्षांना कसे गलितगात्र करतां येईन याची भाजपाने मोहीमच आखली असून, त्यादिशेने त्यांचे प्रयत्न सुरू आहे. केंद्रात जर एककल्ली कार्यक्रम सुरू असेल तर त्याला विरोध हा होणारच. मात्र आम्हाला विरोध करणारे एकतर देशद्रोही ठरवायचे, नाहीतर यांचा विकासाला विरोध आहे, हे सगळेच एका माळेचे मणी आहेत, असे बेछूठ आरोप करायचे भाजपाने सध्या वसाच घेतला आहे.त्यामुळेच प्रदेशिक पक्षांने आता आपली ताकद दाखवण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने आता स्वाभीमानाची झलक दाखवावीच लागेल, त्यासाठी सत्तेतून बाहेर पडण्याशिवाय सेनेला गत्यतंर नाही. सत्तेत सहभागी राहून जर कसलीही किंमत मिळत नसेल, लोकोपयोगी कामे करता येत नसेल, तर अश्या सरकारमध्ये कशासाठी राहायचे. हाच आमचा सेनेला सवाल आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते, तर सेनेला अशी दुय्यम वागणूक देण्याची भाजपाची हिमंत झाली असती का ? नमोच्या लाटेत निवडून आलेल्या नवख्या आमदांरानी काय काम केले हो ? लोकसभेत, विधानसभेत ज्यांना आपले तोंड कधी उघडावे वाटले नाही, ज्यांना आपल्या मतदारसंघातील समस्यांच कळत नाही, त्यांना पुन्हा संधी मिळेल का ? सत्तेत येऊनही आपला परफार्मन्स चांगला नाही, याची जाणीव असूनही प्रदेशिक पक्षांना जेरीस आणण्याचे भाजपाची रणनिती त्यांच्यावरच उलटल्याशिवाय त्यांना कळणार नाही.