मनपाच्या भुखंडावर बिल्डर,व्यावसायिकांचे अतिक्रमण
। ओढा बुजविल्याने बोल्हेगाव फाट्यावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात । नागरिकांचे मनपाला निवेदन
अहमदनगर, दि. 11 - नगर-मनमाड रोडवरील नागापुर पुलाजवळ असलेल्या बोल्हेगाव फाटा येथील मोठा नाला (ओढा) बुजवून अतिक्रमण करण्यात आली आहेत. या ओढ्याजवळच मनपाच्या मालकीचा सात गुंठे भुखंड आहे. या भुखंडाच्या चारही बाजूने काही व्यावसायिक व एका बिल्डरने मोठे अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामुळे परिसरातील सांडपाणी व नाल्यातील पाणी वाहून जाण्यास जागा नसल्याने पाणी साचवून दुर्गंधी वाढली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.बोल्हेगाव फाटा येथील रस्त्यावरील दुकानांच्या मागे व शेजारुन जुना नाला वाहत होता. याच भागात बापू मेहेत्रे यांची जमीन होती. त्यांनी त्याच्या मालकीच्या जमीनीत प्लॉट पाडून त्याची रितसर विक्री केली. याच जमीनीलगत मनपाच्या मालकीचा सात गुंठे राखीव भुखंड आहे. हा भुखंड बर्याच दिवसापासून अविकसित अवस्थेत पडून आहे. मनपाच्या अतिक्रमण विभाग, नगर रचना तसेच परिसरातील दोन्ही नगरसेवकांचे दुर्लक्ष झाले आहे. त्याच्या दुर्लक्षामुळे अवस्था हितसंबंधामुळे राखीव भुखंड तसाच बेरजेत नसल्यासारखा पडला आहे. या भुखंडाशेजारी जुना नाला व गटार भुखंडाच्या शेजारी असलेल्या प्लॉट धारक व दुकानदार तसेच एका बिल्डरने बंद केला आहे. त्यामुळे भुखंडाला छोट्या तलावाचे स्वरुप आले आहे. त्यातच सदर जागेत पुर्वीपासून पुरातन छोटे देवीचे मंदिर आहे. परिसरातील जागा मालक या देवीचे भक्त आहेत. मात्र, सदर भुखंड व मंदिर सध्या घाणीच्या विळख्यात अडकले आहे. साचलेल्या घाण पाणी व कचर्यामुळे डास व इतर विषारी जनावरे वाढली आहेत. याचा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर ठिकाणी मोठे गवत वाढले आहेेत. परिसरातील व्यवसायिकांनी दुकानातील कचरा भुखंडावर टाकला आहे. याचीही दुर्गंधी पसरली आहे. एका बिल्डरने चक्क तिन मजली इमारत बांधून भुखंडावर तब्बल 10 फुटाचे अतिक्रमण करुन भुखंडाकडे जाणारा रस्ताच अरुंद केला आहे.
भुखंडावरील अतिक्रमण व नाला बुजविल्याप्रकरणी परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तसेच नगरसेवकांकडे तक्रारी केल्या. मात्र कोणत्याही तक्रारीचे अद्याप दखल घेण्यात आली नाही. महानगरपालिकेने सदर भुखंड बगिचा, समाजमंदिर, यासाठी विकसित करावा, मनपाकडे हा भुखंड विकसित करण्यासाठी निधी नसेल तर परिसरातील नागरिक मदत गोळा करुन पालिकेला देतील. अथवा डोनेशनच्या माध्यमातून भुखंड विकसित करावा, अशी मागणी ही अनेक वेळा मनपाकडे करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. या पार्श्वभुमीवर परिसरातील बुजविलेला नाला व त्यातील कचरा व घाण काढून नाला व्यवस्थीत करण्याची गरज आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे याच परिसरातील अनेक वसाहतीमध्ये गटारीचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले होते. त्यानंतर नागरिकांनी रात्री दीडच्या सुमारास प्रभागातील नगरसेवकांना मोबाईलवर बोलणे करुन वसाहतीत बोलावून घेतले होते. यावेळी नागरिकांनी वेगळ्याच भाषेत नगरसेवकाचे कानउघडणी केली होती. याचा बोध घेऊन नगरसेवकांनी मनपाच्या भुखंडावर झालेले अतिक्रमण व बिल्डरने बुजविलेला ओढा मोकळा करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अतिक्रमण विभागाने सदर भुखंड व त्यावरील अतिक्रमणे हटविली नाही तर परिसरातील नागरिक या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरवून आंदोलन करतील असा इशारा दिला आहे. या भुखंडावरील बिल्डरने केलेले अतिक्रमण त्वरीत मोकळे करावे अन्यथा मनपाच्या अतिक्रमण विभागाविरुध्द न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, असा इशारा तेथील काही नागरिकांनी बोलतांना आमच्या प्रतिनिधीकडे केला आहे.
