Breaking News

दिघावासियांसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार सरकार

नवी मुंबई, दि. 12 -  येत्या सोमवारी दिघावासियांच्या घरांसाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाईल, असे आश्‍वासन शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी दिल्यामुळे तूर्तास दिघावासियांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर दिघ्यातल्या घरांसाठी अध्यादेश काढू, असेही राजन विचारे यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने सांगितले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबईतल्या घरांना अनधिकृत ठरवत लोकांना घर सोडण्याचे आदेश दिले आहेत. कँपाकोलासाठी सर्व कायदेविषयक बाबींचा पाठपुरावा करणार्‍या सरकारने दिघ्यासाठी मात्र दुजाभाव केल्याचा आरोप आहे. याशिवाय आश्‍वासन मिळाल्यानंतरही आम्ही आंदोलन थांबवणार नाही, असा निर्धार दिघावासियांनी केला आहे.
दरम्यान दोन दिवसात घर रिकामी करण्याचे आदेश मिळाल्याने दिघावासियांनी आज ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केले. मात्र, त्यादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी येऊन एकनाथ शिंदेंविरोधात घोषणा दिल्या. यानंतर शिवसेनेनेही राष्ट्रवादीच्या गणेश नाईक आणि संदीप नाईक यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली.