Breaking News

मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत प्रवीण आमरे

मुंबई, दि. 11 - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत माजी भारतीय क्रिकेटपटू प्रवीण आमरे देखील उतरले आहेत. प्रशिक्षकपदासाठी आमरे यांनी रितसर अर्ज दाखल केला आहे. 47 वर्षीय आमरे यांनी रॉबिन उत्थप्पा, अजिंक्य रहाणेसारखे खेळाडू घडवण्यात सिंहाचा वाटा उचलला असून आता मुख्य प्रशिक्षकपदासाठी संदीप पाटील, रवी शास्त्री, बलविंदर सिंग संधू, वेंकटेश प्रसाद व लालचंद रजपूत यांच्याशी त्याची स्पर्धा असेल.
दि. 1 जून रोजी मुख्य प्रशिक्षकपदाची जाहिरात बीसीसीआयने प्रसिद्ध केली. त्यानंतर सर्वप्रथम रवी शास्त्री व नंतर संदीप पाटील, रजपूत आदींनी आपले अर्ज दाखल केले. बुधवारी एकाच दिवशी वेंकटेश प्रसाद व संधू या रिंगणात दाखल झाले तर आता प्रवीण आमरेने देखील नशीब आजमावून पाहण्याचा निर्णय घेतला आहे. आमरे यांनी भारतीय संघातर्फे 11 कसोटी व 37 वनडे सामने खेळले आहेत.
प्रवीण आमरे यांना शैलीदार फलंदाजी व दरबान येथे पदार्पणातच शतक झळकावल्याबद्दल विशेष ओळखले जाते. 1992 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अ‍ॅलन डोनाल्ड, ब्रेट स्कूल्त्झ यांच्या मा-याला सामोरे जात शानदार शतक झळकावले होते. प्रवीण आमरे यांनी मुंबई रणजी संघाला प्रशिक्षण दिले असून याचबरोबर आयपीएलमध्ये दिल्ली डेयरडेव्हिल्स संघासाठी देखील ते प्रशिक्षक राहिले आहेत. सध्या झिम्बाब्वे दौ-यावर संघासमवेत रवाना झालेला जयंत यादव देखील आमरे यांचाच शिष्य आहे.