धोणीच्या ‘बोलंदाजी’ने पत्रकार ‘क्लिन बोल्ड’
मुंबई, दि. 1 - टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी जशी मैदानात तडाखेबाज फलंदाजी करतो तशी पत्रकार परिषदेत बोलंदाजीही करतो. धोणीचा आणखी एक नवा अंदाज काल पाहण्यास मिळाला. एका पत्रकाराने निवृत्तीबद्दल प्रश्न विचारला असता धोणीने व्यासपीठावर बोलवून पत्रकाराची चांगलीच शाळा घेतली.
वानखेडे स्डेडियमवर टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडीजकडून भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवामुळे भारताचं टी 20 वर्ल्डकपचं स्वप्न भंगलं. या मॅचनंतर धोणीने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ऑॅस्ट्रेलियन पत्रकार सैम्युलन फेरीस यांनी वर्ल्डकपमधून टीम इंडिया आता बाहेर पडलीये तर धोणी निवृत्त होण्याचा विचारात आहे का ? असा सवाल केला. यावर धोणीने फेरीस यांना पुन्हा प्रश्न विचारण्यास सांगितलं.
फेरीस यांनी पुन्हा हाच प्रश्न विचारला आणि धोणींनी त्यांना मध्येच थांबवत व्यासपीठावर येण्याचं सांगितलं. अचानक धोणी आपल्याला का बोलावतोय. यामुळे फेरीस गोंधळात सापडले. पण, धोणीने पुन्हा एकदा व्यासपीठावर आपल्या जवळ येण्याचं सांगितलं. जेव्हा फेरीस व्यासपीठावर आले तेव्हा धोणीने त्यांना आपल्याजवळ बसवलं. आणि प्रश्न केली, मला सांगा मी खरंच निवृत्ती घेऊ का ? यावर फेरीस अडखळले आणि नाही उत्तर दिलं आणि म्हणाले, मला असं विचारायचं नव्हतं.
धोणीने पुढचा प्रश्न केला, मला सांगा मी फिट दिसत नाही का ? या प्रश्नाने रूममध्ये शांतता पसरली. फेरीस म्हणाले, नाही तुम्ही चांगले फिट दिसताय आणि कमालीची खेळी करता. धोणीने आणखी एक प्रश्न विचारला, मला सांगा मी 2019 च्या वर्ल्डकपपर्यंत खेळू शकतो का ? यावर फेरीस म्हणाले, हो तुम्ही निश्चित खेळू शकता. यावर धोणी म्हणाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच दिले आहे. त्यामुळे मला आता यावर काही बोलण्यासारखं राहिलं नाही. धोणीच्या या बोलंदाजीपुढे फेरीस क्लिन बोल्ड झाले आणि आपल्या खुर्चीवर जाऊन विराजमान झाले. धोणीचा हा अनोख अंदाज पाहुन उपस्थिती पत्रकारही अवाक् झाले.