मिरीत शेतकर्यांचा विभागीय आयुक्तांना घेराव
करंजी । प्रतिनिधी । 02 पाहणी काय करता, छावण्या सुरु करा, टँकर द्या असे म्हणत विभागीय आयुक्त एकनाथ डौले व जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना काळे झेंडे दाखवत शिवसेना आणि शेतकर्यांनी प्रशासकीय अधिकार्यांना घेराव घातला.
पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाला शेतकर्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास विभागीय आयुक्त डौले, जिल्हाधिकारी अनिल कवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, प्रांताधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार सुनीता र्जहाड यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रत्येक गावात जनावरांसाठी छावण्या सुरू करा, वाड्या-वस्त्यांवर टँकर सुरु करा, हाताला काम द्या, अशा घोषणा देत मिरी गाव शिवसैनिकांनी दणाणून सोडले. विभागीय आयुक्तांना मिरी येथील जय आनंद गो शाळेला भेट दिली, त्यावेळी त्या ठिकाणी संतप्त शेतकरी व शिवसैनिकांनी डौले यांना घेराव घातला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे, तालुकाप्रमुख रफिक शेख, ज्येष्ठ नेते साहेबराव गवळी, सरपंच शशिकला सोलाट, उपसरपंच अमोल कुटे, युवानेते संतोष शिंदे, पोपटराव कराळे, नारायण कराळे, उद्धव दुसुंग, सतीश कराळे, शरद गवळी, भागिनाथ गवळी, बाळासाहेब घुले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत दुष्काळी दौरा करण्यासाठी आलेल्या प्रशासकीय अधिकार्यांचा निषेध व्यक्त केला. शेतकर्यांच्या रोषाला सामोरे जात आयुक्त डौले यांचा ताफा पुढे शेवगावकडे रवाना झाला.दुष्काळी परिस्थिती पाहण्यासाठी आलेल्या आयुक्तांना पहिल्याच गावात शेतकर्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.दुष्काळी दौरा करण्यासाठी वरिष्ठ पथक येणार, याची शिवसेना नेत्यांना अगोदरच चाहूल लागली होती, त्यामुळे त्यांनी तिसगावचे रास्ता रोको आंदोलन आटोपून लगेच मिरीत शेतकरी व शिवसैनिकांची जमवा-जमव केली. आयुक्त डौले यांनी देखील तुमच्या भावना वरिष्ठांना कळवू, असे म्हणत वेळ मारुन नेली.