पुण्यातही लोकल सुरू करण्याचा विचार : प्रभू
पुणे, दि. 1 - मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही लोकल रेल्वे सुरु करण्याबाबत काही योजना करण्याचा विचार आहे, त्यासाठी निधी देण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. गोखले इन्स्टिट्यूटमध्ये शनिवारी सुरेश प्रभू यांचे ‘व्हिजन फॉर इंडिया‘ या विषयावर व्याख्यान होते, त्यावेळी ते बोलत होते.
प्रभू म्हणाले की, शाळेत असल्यापासून हा विषय आपल्याला कधीतरी सांगितला जातो. मोठे होताहोता मात्र या ‘व्हिजन‘ बदलत जातात. व्हिजन प्रत्यक्ष कृतीत कसे आणावे, हे आव्हान असते. वास्तव हे स्वप्नापेक्षा वेगळे असते. आर्थिक विकासासशिवाय नोकर्या शक्य नाहीत. आर्थिक विकासासाठी गुंतवणूक हवी किंवा खर्च करण्याची क्षमता वाढवायला हवी. या गोष्टी परस्परांवर अवलंबून आहेत. लोकांचे उत्पन्न वाढविणे हे आव्हान आहे. घरगुती बचत, कॉर्पोरेट बचत आणि शासकिय बचत या तिन्ही गोष्टींवर काम होणे आवश्यक आहे. कमी आर्थिक उत्पन्न असणारा गट बचतीत हातभार लावणे जवळपास अशक्य आहे. त्यातल्या त्यात मध्यमवर्गाकडून या अपेक्षा करता येऊ शकतात. मात्र, मध्यमवर्गाने देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावायचा झाल्यास या वर्गाला नोकर्या देणे सरकारचे कर्तव्य आहे. गुंतवणूक, उत्पन्न, बचत, नोकरी, विकास या गोष्टी परस्परांच्या हातात हात घेत पुढे जातात. एफडीआय वाढविले पाहिजे. त्यातूनच विकासाचा गाडा सुकर होणार आहे. या प्रकारे गुंतवणूक वाढल्यास दरडोई उत्पन्न वाढणार आहे. ‘ब्ल्यू कॉलर जॉब्स‘ ही आजची गरज आहे. उत्पादन क्षेत्र हे परिणामकारकतेने करू शकेल. मेक इन इंडिया हे खरेतर ‘मेकिंग ऑफ टुमॉरोज इंडिया‘ आहे. डिजिटल इंडिया आणि स्किलिंग इंडिया याचाही हातभार अनेक थरांनी विकासाची शिडी चढण्याचा होणार आहे. पायाभूत सुविधांत जेवढी गुंतवणूक वाढेल, तेवढा विकासाचा गाडा वेगाने हाकला जाईल.
सामाजिक प्रश्न ही महत्त्वाचे आहेत. आर्थिक विकास हे एकच उद्दिष्ट ठेवणे पुरेसे नाही. भारतात लिंगभेदाचा प्रश्न मोठा आहे. स्त्री शिक्षण हा प्रश्नही आहे, हे बदलायला हवे. महिला या व्हाव्यात ‘ग्रोथ इंजिन‘. ‘राष्ट्र‘ म्हणून सर्वांचा विकास व्हावा, यासाठी जपान सारखा एक राष्ट्र विचार आपण निर्माण करायला हवा. ‘नियोजन‘ हे या सगळ्याचे मूळ आहे. ‘मॅक्रो इकॉनॉमिक्स‘ आणि ‘मायक्रो इकॉनॉमिक्स‘ यांनी एकत्र येत अर्थव्यवस्था पुढे जाईल. गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि इच्छाशक्ती ही त्रिसुत्री आहे, असे प्रभू यांनी सांगितले.