स्त्री समानतेच्या दिशेने ?
उच्च न्यायालयाने पुरूषांप्रमाणेच महिलांना देखील मंदिरात पुजा करता येईल असा ऐतिहासिक निर्णय दिला त्याचे स्वागतच आहे, परंतू महिलांना मंदिरात प्रवेश मिळाला म्हणजे महिलांचे सर्व प्रश्न सुटणार आहे का? हा आमच्यासमारेचा महत्वाचा प्रश्न आहे. पुजा पाठ, व्रत वैकल्ये यामध्ये बहूजन समाज गुरफटला आहे, विशेषत: स्त्रिया असे असतांना, मंदिरात प्रवेश मिळाला म्हणून आमच्या महिलांनी हुरळून जावू नये, आपल्या न्याय हक्काची लढाई अजूनही पुर्ण झाली नाही, त्यामुळे आज स्त्रियांच्या सममस्या खर्या अर्थाने वेगळया आहेत, त्या समोर येणे त्याच्याविरूद्ध लढा उभारणे काळाची गरज आहे. आजपर्यंत आमच्या महिलांना मंदिरात प्रवेश नसल्यामुळे त्यांचे जीवन दु:खी होते. आणि आता न्यायालयाच्या निर्णयामुळे, अथवा त्या मंदिरात गेल्यामुळे त्यांच्या जीवनात ऐतिहासिक परिवर्तन होईल असे काही मुळीच घडणार नाही.त्यासाठी खर्या अर्थाने एक व्यापक लढाई आपल्याला उभारावी लागेल. नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे रक्षण करणे ही सरकारचीच जबाबदारी असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यामुळे साहजिकच आता धार्मिक स्थळी कोणताही भेदभाव करता येणार नाही, त्यामुळे शनिमंदिरातील महिला प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुरूषाप्रमाणे स्त्रियांना देखील आता मंदिराच्या गाभार्यात जावून पुजा करता येणार आहे. यानिर्णयामुळे महिलांच्या जीवनात काही क्रांतीकारक परिवर्तन घडणार नाही.पाश्चात्य देशात 1890 साली इंग्लंड आणि 1910 साली अमेरिकेत स्त्रियांनी त्यांचे मूलभूत हक्क मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला. यादरम्यान भारतातील स्थिती फार वेगळी होती. धर्म-जाती संस्कृतीच्या नावाखाली परंपरांच्या बंधनांध्ये जखडून ठेवलेल्या भारतीय स्त्रियांना आपल्या हक्कांबद्दल फारशी जाणीवही नव्हती त्यामुळे आंदोलने वगैरे उभारणे दूरच्या गोष्टी.19 व्या शतकाच्या अखेरीस सुधारणावादी चळवळीमार्फत आपल्याकडची स्त्रीवादी चळवळ उभी राहिली. युरोपातील स्त्रीवादी चळवळ ही पूर्णतः तेथील स्त्रियांनी उभारली होती पण भारतात मात्र पुरुषांनी सुरुवात केली. स्त्रियांना त्यांच्या शोषणाविरोधात जागृत करण्याबरोबरच सशक्त स्वातंत्र्य चळवळीसाठी त्यात आवश्यक असणारा स्त्रियांचा सहभाग आणि प्रगत समाजाची जडण-घडण होण्यासाठी अनुकूल वातावरण आपल्याकडे नव्हते. मुख्य म्हणजे भारतीय समाज सुशिक्षित नव्हता. त्यामुळेच महात्मा फुले यांनी स्त्री साक्षरता ला प्रथम प्राधान्य दिले. तिथूनच खर्या अर्थाने महिला आपल्या न्याय हक्कासाठी लढू लागल्या.त्यामुळेच मुक्ता साळवे या तरूणीने आपल्या निबंधात धर्माच्या रूढ प्रथांवर कोरडे ओढले होेते. मात्र आज महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी उभारलेली लढाई जेव्हा मंदिर प्रवेशापर्यंत सिमीत राहते तेव्हा मात्र वेदना होतात. आजची स्त्री सुशिक्षित झाली, आपले प्रश्न समस्या ती स्वत: मांडू लागली, बोलू लागली, असे असतांना तिला मंदिरप्रवेशासारख्या क्षुद्र, गोष्टीत अडकून ठेवणे कितपत योग्य आहे. त्यामुळेच आज पुन्हा एकदा महिला प्रश्नावर चर्चा होण्याची गरज आहे.