Breaking News

प्रत्युषाच्या आत्महत्येप्रकरणी राहुल सिंह ताब्यात

मुंबई, दि. 2 -  ‘बालिका वधू’ या गाजलेल्या मालिकेतील आनंदी‘ची भूमिका करणारी अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येप्रकरणी शनिवारी मुंबई पोलिसांनी तिचा प्रियकर राहुल सिंह याला ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी दुपारी प्रत्युषाचा मृतदेह तिच्या घरात सापडला होता. तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राहुल सिंह हा पोलिसांच्या संपर्कात होता. अखेर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.गोरेगावमधील मोतीलालनगर येथील हार्मनी रेसिडेंट‘च्या सातव्या मजल्यावर राहणारी प्रत्युषा काही दिवसांपासून प्रियकरासोबत असलेल्या नातेसंबंधांतील तणावामुळे निराश झाली होती.दुपारी घरात एकटीच असताना तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन मित्रांनी तिला कोकीलाबेन अंबानी रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारांपूर्वीच मृत घोषित केले.टीव्ही मालिकांत अतिशय संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी प्रत्युषा तिच्या वैयक्तिक जीवनातही तेवढीच संवेदनशील होती. मृत्यूपूर्वी तिने तिच्या मोबाईलवरील व्हॉट्सऍप स्टेटस मर के भी मूंह न मुझसे मोडना‘ असे ठेवले होते.
प्रत्युषाची आत्महत्या नव्हे तर हत्या 
प्रत्युषाच्या आत्महत्येप्रकरणी आज विविध कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या असून, ही आत्महत्या नसून, सुनियोजित हत्या असल्याचा आरोप प्रत्युषाचा सहकलाकार आणि अभिनेता अजाज खानने केला आहे. अभिनेत्री डॉली बिंद्रानेही तिच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करतानाच तिच्यासारखी खंबीर मुलगी आत्महत्येसारखे पाऊल उचलणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.
शुक्रवारी संध्याकाळी गोरेगावमधील राहत्या घरी प्रत्युषाने गळफास लाऊन आत्महत्या केली. तिला उपचारांसाठी तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिला मृत घोषित करण्यात आले. प्रियकरासोबत सुरु असलेल्या वादामुळे हे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळत आहे.