शेतकर्यांवरील गुन्हे मागे घेणार ! मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
मुंबई, दि. 2 - राज्य सरकार आपल्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणा-या शेतकर्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत असल्याच्या विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, मी पार्टटाईम नव्हे तर ओव्हरटाईम गृहमंत्री आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. गृह खात्यावरील अनुदानाच्या मागणीवरील चर्चेदरम्यान दुष्काळ व अन्य प्रश्नांसाठी शेतकर्यांनी केलेल्या आंदोलनाबद्दल त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी केली होती. चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबतचा तपशील मागवून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चांगली आहे. एकीकडे गुन्ह्याचे प्रमाण तर कमी झाले आहेच, पण दुसरीकडे गुन्हा सिद्धतेचे प्रमाण वाढले आहे. 2009 साली गुन्हा सिद्धतेचे प्रमाण केवळ 9 टक्के होते ते 2014 मध्ये 14 टक्क्यांवर गेले. मात्र गेले दीड वर्ष यात लक्षणीय कामगिरी झाल्याने आता हेच प्रमाण 52 टक्क्यांवर गेल्याचे त्यांनी सांगितले.