Breaking News

शिर्डी जन्मदिनीच शवविच्छेदन! माऊलीचा आक्रोश पोलीस निरिक्षकांना नियंत्रण कक्ष; 4 पोलीस कर्मचारी निलंबित; कुंभकार आणि दलित चळवळ रस्त्यावर; सीआयडी चौकशीचे उपचार

शिर्डी, दि. 1 - 16 वर्षाच्या किरणचा वाढदिवस साजरा करण्याचे स्वप्न पाहणार्‍या माऊलीच्या वाट्याला पोटच्या गोळ्याचे शवविच्छेदन याची डोळा पाहण्याचे दुर्दैव्य आले आणि साईबाबांच्या शिर्डी पोलीस ठाण्यातच माऊलीने हंबरडा फोडला. पोलीसांच्या बेदरकार हलगर्जीपणाचा बळी ठरलेला किरण परत येईल का, असा आक्रोश ही माऊली करीत आहे. दरम्यान, ज्यांच्या बेदरकार हलगर्जीपणामुळे किरणचा बळी गेला ते ठाणे अंमलदार आयुब शेख, कस्टडी इंचार्ज एएसआय रज्जाक शेख, गार्ड आव्हाड व माने या चौघांना निलंबित करण्यात येऊन पोलीस निरिक्षक प्रमोद वाघ यांना तात्काळ नियंत्रण कक्षात नियुक्ती देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आली असून नाशिक सीआयडीचे उपअधिक्षक सावंत तपास करीत आहेत. अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघ आणि बारा बलुतेदार महासंघाचे अशोक सोनवणे, विठ्ठल आण्णा राऊत तसेच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दलित चळवळीचे असंख्य कार्यकर्ते शिर्डीत तळ ठोकून होते. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीवर अप्पर अधिक्षक संजय जाधव आणि उपअधिक्षक विवेक पाटील यांनी खुबीने नियंत्रण मिळविले. दरम्यान उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश हरियाना, महाराष्ट्र, केरळ, तामीळनाडू आदि राज्यातील अ.भा.प्रजापती कुंभकार समाजाच्या कार्यकर्त्यांनी लघूसंदेश पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घटनेचे गांभीर्य कळविले आहे.
या संदर्भात विविध वृत्त सुत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, किरण अशोक रोकडे हा 16 वर्षाचा मुलगा मंदिराच्या बाहेर नेहमीप्रमाणे प्रसादविक्री करीत असतांना राक्षे नामक पोलीस सुरक्षा रक्षकाने पाकीट मारीच्या संशयावरून त्याला पोलीसांच्या ताब्यात दिले. गुरूवारी 10 वाजता ताब्यात घेतलेल्या किरणचा 12.30 वा. मृत्यू झाल्याचे वृत्त पोलीसांनी नातेवाईकांना कळविले. किरणला थर्डडिग्री वापरून बेदम मारहाण केल्यानेच मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करीत नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला.
गळफास घेतला - पोलीस
मारहाण केल्यामुळे नव्हे तर कमरेच्या पट्ट्याने किरणने गळफास घेतला त्यात त्याचा मृत्यू झाला असा युक्तीवाद शिर्डी पोलीसांनी केला.
मारहाणीतच मृत्यू - नातेवाईक
पोलीसांनी केलेला युक्तीवाद खोडून काढतांना किरणच्या नातेवाईकांनी त्याला पोलीस ठाण्यात बेदम मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. 16 वर्षाच्या मुलांवर केवळ संशयावरून सराईत गुन्हेगाराप्रमाणे अत्याचार झाल्याचा आरोप नातेवाईकांनी ठेवला आहे.
अंगझडती का नाही
संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची झडती घेतली जाते. स्वतःला किंवा इतरांना इजा पोहचवू शकेल अशी कुठलीही चिजवस्तू आरोपीजवळ अथवा आरोपींच्या अंगावर ठेवली जात नाही. कमरेचा करदोडाही काढून घेतला जातो. मग किरणने फास कसा घेतला अशी विचारणा नातेवाईक करीत आहेत.
कसूरीसाठी निलंबन
किरणने कमरेच्या पट्ट्यानेच गळफास घेतला या मतावर अ.नगर पोलीस ठाम असून बेदरकार हलगर्जीपणा करून किरणची अंगझडती घेण्यात कसूर केली म्हणून ठाणे अंमलदार आयुब शेख, गार्ड इन्चार्ज एएसआय रज्जाक शेख, गार्ड आव्हाड व माने यांना निलंबित केले आहे. तर पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना नियंत्रण कक्षात हलविण्यात आले आहे.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
4 पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करून पोलीस यंत्रणेने नातेवाईकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी या कारवाईवर नातेवाईक समाधानी नाहीत. या दोषी कर्मचार्‍यांवर किरणच्या मृत्यूला जबाबदार धरून गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे.
सोनवणे-राऊत-आंबेडकर त्रिकुटाची शिष्टाई
शिर्डीचा दुर्देवी प्रकार समजताच संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करीत असतांनाच योग्य कारवाई व्हावी यासाठी अ.भा.प्रजापती कुंभकार महासंघ आणि बारा बलुतेदार महासंघाचे नेते अशोक सोनवणे, विठ्ठल आण्णा राऊत, भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी समन्वयकाची भुमिका वठवून यशस्वी शिष्टाई केली. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि अशोेक सोनवणे यांनी संतप्त नातेवाईक आणि पोलीस ठाण्याशी सातत्याने संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला.