Breaking News

छावण्या-पिण्याच्या पाण्याप्रश्‍नी तिसगावात शिवसेनेचा रास्ता रोको

तिसगाव । प्रतिनिधी । 02 अहमदनगर जिल्ह्यासह तालुक्यात जनावरांचा चारा, जनावरांना पाणी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर, बिकट झाला असून, शिवसेनेने लोकशाही मार्गाने शांततेत धरणे आंदोलन करूनही प्रशासन व लोकप्रतिनिधी दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात अपयशी झाले असून, प्रशासन व लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी शिवसेनेच्यावतीने तिसगाव येथे रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोकोचे नेतृत्व जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे, तालुकाप्रमुख रफिकभैय्या शेख, युवा सेनेचे अनिल रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी शिवसेनेच्या रास्ता रोकोत राष्ट्रवादीचे नेते केदारेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी सहभाग घेवून पाठिंबा दिला. यावेळी प्रताप ढाकणे यांनी सत्ताधारी खासदार तालुक्याच्या आमदारावर अपयशी लोकप्रतिनिधी म्हणून टीका करत लोकप्रतिनिधींना दुष्काळाचे काही देणे-घेणे नाही. प्रशासनाने शासनाला तालुक्यातील वस्तुस्थितीचा अहवाल पाठवावा व त्वरित छावण्या-पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावावा अन्यथा जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे (सर) यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे यांनी तालुका दुष्काळमय बनला असून, जनावराला चारा, हाताला काम, प्यायला पाणी द्या, प्रशासनाने बळीराजाचा अंत न पाहता छावण्या, पिण्याचे पाणी टँकर त्वरित सुरु करावेत व पशुधन वाचवावे. यावेळी तालुका युवा सेनेचे अध्यक्ष अनिल रांधवणे, तालुका उपप्रमुख राम लाड, सुरेश वाघ, शिवेसना पाथर्डी शहरप्रमुख भाऊसाहेब धस, विभागप्रमुख भगवान दराडेसह शिवसैनिक मोठया संख्येने रास्ता रोकोस उपस्थित होते. तहसीलदार श्रीमती सुनीता र्जहाड यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून आपल्या मागण्या वरिष्ठांना कळवल्या असून, छावण्या-पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न लवकर
मार्गी लावला जाईल, असे आश्‍वासन दिले. सकाळी 10 वाजता सुरु झालेला रास्ता रोको 2 तासानंतर सुटला. यावेळी घाटशिरसचे उपसरपंच नवनाथ पाठक, तिसगाव सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब लवांडे, संचालक शरद शेंदूरकर, उद्योजक कपिल अगरवाल, लक्ष्मण गवळी, बाबासाहेब बुधवंत, शरद गवळी, नाथा वाबळे संतोष अकोलकर, दिलीप पाथरे, कल्याण लवांडे, अनिल क्षेत्रे, रवि पाथरेसह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. रास्ता रोकोमुळे महामार्गावर मोठया वाहनांचा रांगा लागल्या होत्या. पाथर्डी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.