Breaking News

भुजबळसाहेब! भैसा जरूर दुध देगा... ही तर आबांचीच इच्छा!

प्रति,
छगन चंद्रकांत भुजबळ,
माजी महापौर, मुंबई,
माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, बांधकाम मंत्री, माजी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, आमदार येवला
सद्यस्थितीत आरोपी नं.1
मुक्काम - अंडा बॅरक नंबर -12,
आर्थर रोड, मध्यवर्ती कारागृह,
भायखळा, मुंबई.
महोदय,
आज हे सविस्तर पत्र आपणांस लिहित आहे. गृहमंत्री असतांना तुम्ही व तुमचा लाडका पुतण्या समीर कशा पध्दतीने पोलीस अधिकार्‍यांना रामटेकवर बोलावून त्यांचा पाणउतारा करीत होतात. आठवा!! आय.पी.एस. दर्जाच्या अधिकार्‍यांना दोन-दोन तास लटकवत ठेवणे, हेतुत: अपमानास्पद वागवणुक देणे, हा तुमच्या रक्तातील गुण तुमच्या पुतण्यात तंतोतंत उतरला आहे. कारण माहित नाही. पण दोघांचा डी.एन.ए. सारखाच असावा. संजीव कोकीळ या पोलीस अधिकार्‍यावर तर, धादांत खोट्या केसेस करून अडकविले. लाचार हुजर्‍या लाळघोट्या अधिकार्‍यांना हाताशी धरून त्या बिचार्‍याचे जीवनच उध्वस्त करून टाकले. अत्याचार्‍याच्या, झुंडशाहीच्या, उध्दटपणाच्या, अन् दुसर्‍याला कस्पटासमान समजून त्यांच्याशी केलेल्या वर्तणुकीच्या सर्व आठवणी आता तुमच्या समोर फेर धरून नाचत असतील. आमच्या सारख्या असंख्य निरपराध लोकांची स्वप्ने तुम्हाला पडतील. सत्तेच्या माजात आपण हे काय केले? असे वाटतहि असेल! जे पेरलं तेच उगवलं फक्त उशीरा! भुजबळ तुमच्याकडे खूप पैसा आहे. आपलं निर्दोषत्व सिध्द करण्याकरीता आपण जगातले मोठ मोठे वकील आणू शकाल. आपण गृहमंत्री होतात. अन्य कैद्यांपेक्षा जास्त सवलती आपणांस तुरूंगात मिळतीलच! न मिळाल्यास यामुळे अन्य कैद्यांप्रमाणे किँमत चुकवून विकत घ्याल! पण माझ्यासारख्याचे आणि माझ्याबरोबर असलेल्या त्या निर्दोष प्रामाणिक पोलीस  अधिकार्‍यांचे काय हाल झाले? काकडे नावाच्या सबइन्स्पेक्टरने तेलगी प्रकरणातील खोट्या आरोपांचा धसका घेऊन तुरूंगातच प्राण सोडून दिले. त्याच्या तरूण विधवा पत्नीचा त्याच्या मुलांचा किती तळतळाट झाला असेल? कशा पध्दतीने ते जगले असतील झाला? जगत असतील? एव्हाना कदाचित आपणांस याची कल्पना यायला सुरूवात झाली असावी. आपल्याला लिहीत असलेल्या पत्राच्या निमित्ताने का होईना तेलगी प्रकरणातील सत्य जनतेला कळालेच पाहीजे. ज्या पोलीस अधिकार्‍यांनी तेलगीचा तीन हजार कोटी रूपयांचा मुद्रांक साठा जप्त केला. त्यांनाच आपण तुरूंगात डांबले. तेलगीला मोक्का लावण्याचा प्रस्ताव तयार करणारे दत्तात्रय डाळ, तेलगीचा तीन हजार कोटी रूपयांचा मुद्रांक साठा जप्त करणारे प्रथम पुण्यात आयुक्त असतांना व नंतर मुंबईला आयुक्त म्हणून येताच श्री रणजितसिंग शर्मा, आय.आय.टी. चे गोल्ड मेडलिस्ट व महाराष्ट्राचे किमान 3 वर्षे डी.जी. राहिले असते असे श्रीधर वगळ, ज्या धाडसी अधिकार्‍याने मुंबईतील गँगवॉर मोडीत काढले. अंडरवर्ल्डचे कर्दनकाळ प्रदीप सावंत, तेलगीचा छापखाना सापडताच वरिष्ठ अधिकार्‍यांना ताबडतोब कारवाई करण्याची विनंती करणारे पो.नि. गोकुळ पाटील व त्यांचे सहकारी सबइन्स्पेक्टर कै. काकडे तुमचे पुतणे समीर यास क्रिकेटच्या सट्टा बुकीकडून 50 लाख रूपये गोळा करून देणारे ए.पी.आय. दिलीप कामत या सर्वांचा दोष एकच तेलगीच्या साम्राज्याला सुरूंग लावला. बिचार्‍यांचा काही दोष नसतांना यांच्या कुटुंबियांना सहन करावी लागलेली सामाजिक अवहेलना, मानहानी, काही दोष नसतांना भोगावा लागलेला तुरूंगवास याची किँमत परमेश्‍वर तुमच्याकडून पुरेपुर वसुलल करेलच! करेल!
जयस्वाल वाकडे टोळीने एक रूपयाचा मुद्रांक जप्त केला नाही. एकाही आरोपीला अटक केली नाही. तेलगीच्या तीन हजार कोटी रूपयांचा मुद्रांक साठ्यातील 70% मुद्रांक खरे असल्याचे प्रमाणपत्र भारत प्रभुती मुद्रणालयाने दिले. याचा अर्थ तुमच्याच नाशिक मधील इंडिया सिक्युरिटी प्रेस मधूनच तेलगीला मुद्रांक पुरविले जात होते. इंडिया सिक्युरिटी प्रेसचे व्यवस्थापक गंगाप्रसाद यांच्या घराची झडती जयस्वाल वाकडे यांच्या गँगने घेतली. शेकडो कोटी रूपयांची बेहिशोबी संपत्ती सापडली. तरी सुध्दा गंगाप्रसादला मात्र तुमच्या पाळीव पोलीसांनी त्याला आरोपी केले नाही. अटक तर खूपच दूरची गोष्ट! उलट त्यांच्या जप्त केलेल्या बेहिशोबी संपत्तीची कागदपत्रे, लॉकर्सच्या किल्ल्यांसह सन्मानपूर्वक परत केली.हे सर्व आपल्या आदेशाशिवाय घडले का? तुमचा पट्टा गळ्यात घालून फिरणारे हुजरे अधिकारी होते. अर्थात त्यांना सुरक्षित ठेवणे ही आपली भागीदार म्हणून जबाबदारी होती . ज्या पोलीस अधिकार्‍यांनी तेलगीला व त्याच्या सहकार्‍यांना सोडून दिले. अगदी रेल्वेचे तिकीट काढून रेल्वेत बसवून रवाना केल. त्यांचे कौतुक केले. आपली स्वभाव रचना जे ओळखून आहेत त्यांना जाणीव आहेच की, तुम्ही याचीही किँमत वसुल केली असणारच! भुजबळ याच कालावधीत तुमच्या नाशिकच्या बंगल्याच्या तळघरात हजारो कोटी रूपयांचा मुद्रांकाचा साठा सापडला. काय झाले बरे त्याचे ?
छगनराव वर, म्हटल्याप्रमाणे तुम्ही खूप मोठ मोठे वकील लावाल, शरद पवारांसारखे बलाढ्य नेते आपल्या पाठीशी हिमालयासारखे उभे आहेत. त्यामुळे कदाचित तुम्हाला दिलासा मिळेलही! माझी अवस्था तर, वाईट होती. जी काय शिल्लक होती त्यावर घर चालवायचं की वकिलांना पैसे द्यायचे? असा यक्ष प्रश्‍न मला सतावत होता. ड. राम जेठमलानी, ड नितीन प्रधान, ड सतिश माने
शिंदे, कै. ड. पी. एम. प्रधान असे असंख्य वकील माझ्याकडून एक रूपयाही न घेता न्यायालयापुढे हजर झाले. हजर राहायला तयार होते. मी सर्वांना निक्षून सांगितले की, मी काहीही गुन्हा केलेला नाही! मी वकील लावणार नाही! मा. राम जेठमलानी म्हणाले की, बेटा मोक्का ये बहुत सक्त कानून है! थोडीसी गलती भी तुम्हारी जिंदगी बरबाद कर सकती है! तरीही मी माझा हट्ट सोडला नाही. तो नाहीच! माझी बाजू मी स्वत:च कोर्टात मांडीन! माझ्या सर्व वकील मित्रांनी माझी समजुत घालण्याचा खूप प्रयत्न केला पण मी अजिबात मानले नाही. मा. राम जेठमलानी साहेबांनी सांगितले भुजबळ तो कहता है, ’की तुम्हारा और तेलगी का स्टॅम्प प्रिंटींग प्रेस है. भुजबळ इतक खोट ? खोट बोलण्यात तर, आपणास नोबेलच दिले पाहिजे. तुम्ही खोट बोलण्यात मुर्शरफचा सुध्दा पराभव केलात धन्य !  धन्य !
मा. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की,
छगनराव, वकिल न लावता मला न्याय मिळाला. तुम्ही आणि तुमच्या पाळीव, लाचारांनी माझी खूप बदनामी केली. माझ्या मुलाची तेलगीच्या 200 कोटी रूपयांच्या कारखान्यात भागीदारी आहे, माझे परदेशात हॉटेल आहे, मी डान्सबारमधे कोट्यावधी रूपये उधळतो, मला मुलगी नसतांना माझ्या जावयाचा शोधही आपण लावला! माझा हरविलेला जावई 13 वर्षात सापडलेला नाही. आघाडीच्या 15 वर्षाच्या सत्तेच्या काळात माझा जावई शोधून आपण मला परत केला नाही. आपल्या पाळीव लाचार, हुजर्‍या पोलीस अधिकार्‍यांना हाताशी धरून माझी बदनामी करण्याचा कळस गाठला. धुळेकर जनतेला आपल्या लबाडीची व खोटारडेपणाची, कपटी स्वभावाची माझ्यापेक्षा जास्त खात्री असल्याने तुमच्या व तुमच्या नेत्यांच्या शब्दावर धुळेकर जनतेने केसा इतका विश्‍वास ठेवला नाही. तब्बल 32 हजार मतांनी मला कुठल्याही पक्षाचा पाठिंबा नसताना तुमच्या छाताडावर विधीमंडळात पाठवून तुम्हाला सणसणीत चपराक हाणली! माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याकडून कधी चुक झाली असती तर, ताबडतोब दिलगीरी व्यक्त केली असती. किमान त्या व्यक्तीची नाही तर, कुटुंबाची तरी!
भुजबळ तुमचा पापाचा घडा भरला. आपला सूड घेण्याकरिता केंद्र अथवा राज्यातील सरकारला स्वतंत्र काही करावे लागले नाही. लागणार नाही! तुमच्या विरूध्दच्या चौकशीला तत्कालीन गृहमंत्री कै. आर. आर. आबा पाटील दिनांक 21 सप्टेंबर 2012 रोजी परवानगी दिली. आपला असा समज आहे का; अजित पवार किँवा थोरले राजे शरद पवार यांच्या संमती विना किँवा मूक इशार्‍याशिवाय कै. आर. आर. आबांनी आपल्या पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्याविरूध्द चौकशीचे आदेश देण्याचे धाडस केले? आमच्या सरकारला आपणाविरूध्द सूड घेण्याची आवश्यकताच नाही. तुमच्या सर्वांच्या राजकीय मृत्यूपत्रावर आबांनी स्वर्गाकडे कूच करण्यापूर्वीच सही शिक्का मारून गॅझेट करून ठेवले आहे. त्यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाचा आज प्रत्यक्ष खर्‍या अर्थाने झालेला परिणाम स्वर्गातून आबा पहात असतील! त्यांचा आत्मा आज मुक्त झाला असेल! स्वर्गात का होईना पण आपण आबांच्या आत्म्याला सद्गती दिली. याबध्दल आबांचा एकेकाळचा मित्र म्हणून मी आपले मनापासून आभारच मानेन !!
भुजबळ आपण लोकसभेचे उमेदवार असताना झी टि.व्ही.चे संपादक डॉ. निरगुडकर हे मुलाखत घेत होते. मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची आपण केलेली नक्कल आजही माझ्या डोक्यात तशीच तिडीक घेवून बसलली आहे. हमारे गुजरातमें भैंस क्या, भैसा भी दूध देता है  आपण केलेल्या मोदींच्या या नकलेवर डॉ. निरगुडकर मनमुराद हसले. भुजबळ मी आपणांस निश्‍चित सांगतो माझे शब्दहृदयात कोरून ठेवा,  भैसा तो जरूर दूध देगा लेकीन ऑर्थर रोड की अंडा बॅरक में  आजच्या पुरते एवढेच !
- अनिल गोटे, आमदार, धुळे