Breaking News

शहरात 117 मोबाईल टॉवर अनाधिकृत


अहमदनगर । प्रतिनिधी । 02 शहरात विविध मोबाईल कंपन्यांचे 117 मोबाईल टॉवर अनाधिकृत असतांना सुध्दा महापालिकेकडून त्यावर काहीच कारवाई केली जात नसल्याने सदस्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. या टॉवर कारवाई केली जात नसल्याने पालिकेचा महसुल उडत असून 30 एप्रिलपर्यंत या टॉवरवर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी नगररचना विभागाला दिले.
शहरात विविध कंपन्यांचे मोबाईल टॉवर आहेत. ते टॉवर बसविण्यासाठी महापालिके ची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. परवानगी न घेताच हे टॉवर उभारण्यात आले. यातून पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. नगररचना विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात तब्बल 117 टॉवर अनाधिकृत असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नगरसेवकांनी यापुर्वीही झालेल्या महासभेत प्रश्‍न उपस्थित केला होता. महापौरांनी त्यावर अधिकार्‍यांना कारवाईचे आश्‍वासन दिले. मात्र, आश्‍वासन देऊन कारवाई होत नसल्याने अनिल शिंदे यांनी अंदाजपत्रकाच्या सभेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर नगररचनाकार राजेश पाटील यांनी मोबाईल कंपन्यांकडून सादर करण्यात आलेले प्रस्ताव योग्य नसल्याने ते अधिकृत करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. टॉवरवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी देऊन अधिकारी ऐकत नसतील तर हे चुकीचे असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या अनाधिकृत टॉवरची यादी आम्हाला द्या, तुम्हाला जमत नसेल तर आम्ही हे टॉवर पाडून टाकतो, असा इशारा दिला. महापौरांनी नगररचनाकारांना कारवाई करण्यास किती वेळ लागेल असे विचारले असता, त्यांनी दोन ते तीन महिने असे सांगितले. मात्र, 30 एप्रिलच्या अखेरपर्यंत ही कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले.