Breaking News

दिल्लीमध्ये क्षुल्लक कारणावरुन एका डॉक्टराची हत्या

नवी दिल्ली, 25 - देशाची राजधानी दिल्लीमध्ये क्षुल्लक कारणावरुन एका डॉक्टराची हत्या केल्याचे समोर आले आहे. क्रिकेटचा बॉल लागल्याने आरोपींनी डॉक्टरला बेदम मारहाण केली. या प्रकरणी एका महिलेसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी चार जण अल्पवयीन आहेत. 
ही घटना बुधवारी रात्री घडली. विजयाच्या आनंदात डॉक्टर पंकज नारंग मुलासह क्रिकेट खेळण्यासाठी गेले. मात्र त्याचवेळी स्कूटीवरुन जाणार्‍या तरुणांना रबरचा बॉल लागला. त्यामुळे स्कूटीवरील नियंत्रण सुटले. यावरुन त्यांच्यात वाद झाला. तसेच ‘बघून घेऊ’ अशी धमकी देऊन दुचाकीस्वार तिथून निघून गेला. काही वेळाने आरोपी त्यांच्या साथीदारांसह डॉ. पंकज नारंग यांच्या घरी धडकले. त्यानंतर डॉक्टरांना फरफटत घराबाहेर आणले. आरोपींनी लाठ्यांनी आणि लोखंडाच्या रॉडने डॉक्टर नारंग यांना मारहाण केली. आरोपींनी डॉ. नारंग यांना कुटुंबीयांसमोरच मरेपर्यंत मारहाण केली. यावेळी डॉक्टर नारंग यांच्या मेव्हण्याने आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही मारहाण करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी एकूण चार अल्पवयीन मुलांसह नऊ जणांना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी हत्या, हत्येचा प्रयत्न आणि दंगस पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.