Breaking News

सनातनच्या दोन साधकांची होणार पॉलिग्राफ टेस्ट

 पुणे (प्रतिनिधी)। 19 - अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सनातनच्या दोन साधकांची पॉलिग्राफ टेस्ट करण्यासाठी केलेली मागणी पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शीतल बांगड यांनी मंजूर केली असून त्यानुसार हेमंत शरद शिंदे आणि निलेश मधुकर शिंदे यांची पोलिग्राफ टेस्ट होणार आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मोटारसायकलवरून आलेल्यांनी 20 ऑगस्ट 2013रोजी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास बालगंधर्व रंगमंदिराजवळील शिंदे पुल येथे गोळया झाडून हत्या केली होती. हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 23हून अधिक पथकांची स्थापना करण्यात आली. शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासासाठी परराज्यात देखील पथके रवाना केली मात्र त्यांच्या हाती काही एक लागले नाही. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून शहर पोलिसांनी मारेकर्‍यांची रेखाचित्र काढून ती जारी केली. तरी देखील पोलिसांना कोणाकडून माहिती मिळाली नाही. मारेकर्‍यांना गजाआड करण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढल्याने हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना देखील करण्यात आली.सीबीआयकडे प्रकरणाचा तपास गेल्यानंतर अधिकार्‍यांनी शुन्यापासुन तपास केला. अनेकांचे जबाब नोंदविण्यात आले. सनातनचे साधक हेमंत शिंदे आणि निलेश शिंदे यांचे देखील जबाब नोंदविण्यात आले. 
हेमंत आणि निलेश यांनी सीबीआयला समाधानकारक माहिती दिली नाही असे सीबीआयचे म्हणणे आहे. 20 ऑगस्ट 2013रोजी आपण कुठे होतात असा प्रश्‍न सीबीआयकडून दोघांना विचारण्यात आला. दोघांनी त्याबाबत सीबीआयला उत्तरे दिलेली आहेत. हत्या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या सीबीआयकडे असलेली उपलब्ध माहिती आणि दोघांनी दिलेल्या जबाबमध्ये प्रंचड तफावत असल्यामुळे हेमंत आणि निलेश यांच्या पॉलिग्राफ टेस्टची सीबीआयने मागणी केली आहे. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शितल बांगड यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सीबीआयने केलेली पोलिग्राफ टेस्टची मागणी मंजूर करण्यात आली. मुंबईचे एएसपी एस.आर. सिंह यांनी दोघांच्या पाॅलिग्राफ टेस्टला परवानगी मिळावी म्हणुन अर्ज केला होता. आता हेमंत आणि निलेश यांची नवी मुंबई येथील सीबीडी-बेलापूर येथे पोलिग्राफ टेस्ट होणार आहे.