Breaking News

भारतीय जनता पक्षाकडून राहुल गांधींविरोधात ‘बुरखा फाडो’ आंदोलन

 पिंपरी (प्रतिनिधी)। 19 -  जवाहरलाल नेहरु युनिव्हरसिटीतील विद्यार्थ्यांनी देशद्रोही याकुब मेमन आणि अफजल गुरु यांच्या समर्थनार्थ दिल्लीला घोषणाबाजी केली. यासंदर्भात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि डाव्या पक्षाचे नेते डी. राजा यांनी त्यांना पाठींबा दर्शवला होता. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज (गुरुवार) बुरखा फाडो आंदोलन करण्यात आले.  
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरीतील आंबेडकर चौक येथे जाहीर निषेध सभा घेण्यात आली. यावेळी खासदार अमर साबळे, शहर कार्याध्यक्ष माऊली थोरात, भाजयुमोचे अध्यक्ष मोरेश्‍वर शेडगे, नगरसेविका वीणा सोनवलकर, महेश कुलकर्णी, रामकृष्ण दाने, विलास गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी अमर साबळे म्हणाले की, जवाहरलाल नेहरु युनिव्हरसिटीतील विद्यार्थ्यांनी जो अफजल गुरु आणि याकुब मेमन यांना शहीद करण्याचा प्रयत्न केला तो अतिशय निंदनीय आहे. तसेच न्यायव्यवस्थेने मेमन आणि अफजल गुरु यांनी संसदेवर हल्ला केला होता तो फक्त संसदेवरील हल्ला नसून देशाच्या सार्वभौमत्वावर आणि लोकशाहीवर केलेला हल्ला आहे. 
त्याबद्दल त्यांना देशद्रोहाची शिक्षा सुनवली गेली आहे. अशा देशद्रोहींचे समर्थन करणारेही दोशद्रोहीच आहेत. त्यामुळे त्याच्या निषेधासाठी आज हे बुरखा फाडो आंदोलन करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसने इशरत जहालाही देणगी दिली होती.  काँग्रेस अशाप्रकारे देशाच्या विरुद्ध असलेल्या लोकांना पाठीशी घालत आहे. भारतीय जनता पक्ष आणि देशभक्त नागरिक हा प्रकार सहन करणार नाही. यापुढेही कोणत्याही पक्षाने देशाला कलंकित करण्याचा प्रयत्न केला तर तो खपवला जाणार नाही असेही अमर साबळे म्हणाले.