Breaking News

रोबोटिक्स तंत्रज्ञान बाळसं धरतंय

मुंबई, प्रतिनिधी, दि. 16 -  ऑटोमोबाइल्स प्रमाणे मोबाईल, टॅबलेट, कॉम्प्युटर या गॅजेट उत्पादनांमधील अवघड असलेली सूक्ष्म स्पेअरपार्टची जोडणी (मायक्रो असेम्बलिंग) काही सकंदात पूर्ण करणे शक्य होणार आहे. रोबोटिक्स टेक्नॉलॉजीने ही किमया साधली असून, एबीबी इंडियाने मेक इन इंडिया सप्ताहात सादर केलेले दोन यूमी रोबो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.  स्वित्झर्लंडच्या एबीबी कंपनीची भारतीय कंपनी असलेल्या एबीबी इंडियाने आता रोबोटिक तंत्रज्ञानावर भर दिला आहे.
 देशात मोबाईल वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे फॉक्सकॉन, ह्युवेई, सॅमसंग यांसारख्या बड्या मोबाईल उत्पादकांबरोबरच मायक्रोमॅक्स, इंटेक्स या कंपन्यांकडून उत्पादनवाढीवर भर दिला जाणार आहे. मनगटी घड्याळ, मोबाईल आणि टॅबलेटमधील सूक्ष्म स्पेअरपार्टची बांधणी यूमी रोबो काही सेकँदांत करतो. त्यामुळे वेळेची बचत होणार असून, उत्पादन वाढविण्यास मदत होईल, असा विश्‍वास कंपनीने व्यक्त केला आहे. आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यांमधील नव्या मोबाईल उत्पादकांकडून रोबोटची मागणी असल्याचे एबीबी इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. 1974 पासून रोबोटिक्स तंत्रज्ञानात अस्तित्व आहे. भारतीय कंपन्यांमध्ये या तंत्रज्ञानाबाबत जागृती वाढू लागली आहे. मेक इन इंडियामध्ये नावीन्यतेला आणि तंत्रज्ञान वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर येत्या पाच वर्षांत भारतात रोबोटिक्स तंत्रज्ञानाला मोठी मागणी असेल, असा कंपनीला विश्‍वास आहे. बड्या ऑटोमोबाइल्स आणि वाहन उत्पादकांकडून रोबो तंत्रज्ञान वापरले जात आहे. 
रोबोटिक्समध्ये चीनची आघाडी : रोबो तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन आघाडीवर आहे. एबीबी इंडियाकडून चीनमधून या रोबोंची आयात केली जात आहे. त्यानंतर तैवान आणि जपानमधील इलेक्ट्रॉनिक्स कँपन्यांना या रोबोची आयात केली जात आहे. रोबो तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास होणे आवश्यक आहे. रोबो तंत्रज्ञान खर्चिक असल्याने भारतीयांच्या गरजांप्रमाणे रोबो विकसित करत आहे.