उंदीर मांजराच्या खेळात अहवालाची नवी चाल! ; देबडवार, चव्हाण, हांडेवर कारवाईला कुणाची ढाल ?
मुंबई/प्रतिनिधी। 18 - बाधकाम खात्याचा हजारो कोटींचा घोटाळा ‘सार्वजनिक’ झाल्यानंतर कारवाईचा धुराळा उडाला आणि आता या भ्रष्टाचार्यांची गय नाही, खैर नाही. अशा प्रतिक्रिया तितक्याच सार्वजनिकपणे उमटल्या. तथापि या घोटाळ्या संदर्भात सुरू असलेल्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले छगन भुजबळ अमेरिकेतून फ्रेश होऊन आल्यानंतर मात्र घोटाळ्याची धुळ खाली बसत असल्याची भावना सार्वजनिक बांधकाम खात्यात व्यक्त केली जात आहे. दरम्यान भुजबळांना निर्दोष ठरवू पाहणार्या त्या क्लिन चिट अहवालाचे कवित्वही बंद करण्याच्या प्रयत्नांवर तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अंधेरी, कलिना, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अडचणीत आलेले भुजबळ यांना सहीसलामत बाहेर काढण्यासाठी क्लिनचिट अहवालाची खिंड लढविणारे मुख्य अभियंता उल्हास देबडवार अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण आणि आर.आर. हांडे यांना का आणि कुणाचे अभय आहे यावरही वेगवेगळे तर्क वितर्क लढविले जात आहेत. क्लिन चिट अहवालाने साबांत गदारोळ उडाल्यानंतर साबां प्रशासन आणि साबां मंत्रालय यांच्यात असलेला असमन्वय आणि परस्परांवर असलेला अविश्वास चांगलाच चर्चेत आला. छगन भुजबळ यांच्या हातात साबांमंत्रालयाची सुत्रे होती तेव्हा या खात्यात भ्रष्टाचाराची प्रवृत्ती चांगलीच फोफावली. याकाळात उल्हास देबडवार, अतुल चव्हाण, आर.आर. हांडे, किशोर पाटील, यांच्यासारख्या भ्रष्ट टोळीला सुगीचे दिवस आले. एकमेका सहाय्य करू अवघा धरू कुपंथ या न्यायाने साबांच्या या भ्रष्ट टोळीचे साबां मंत्रालयाशी चांगलेच सुत जमले. आज गाजत असलेले अनेक नव्हे जवळपास सर्वच घोटाळे याच काळात आणि याच मंडळींच्या उपस्थित वाजविले गेले. पापात साथीदार आणि भागीदार अशी भुमिका करणारे मंत्रालय आणि प्रशासन यांचे एरवी उंदीर मांजराचे सख्य असलेल्या या नात्यात सलोखा निर्माण झाला.जेंव्हा हे प्रकरण न्यायाच्या उंबरठ्यावर नेण्याची वेळ आली तेंव्हा मात्र तपास यंत्रणेच्या चावडीवर उंदीर मांजरीच्या साक्षीचा खेळ सुरू झाला. आणि या खेळातच क्लिन चिट अहवालाच्या नवीन चालीचा जन्म झाला. अर्थातच ही नवीन चाल शोधून काढली ती मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण आणि आर.आर.हांडे यांनी. गेली 10 वर्षे त्यांच्या भ्रष्टाचाराला ज्यांनी अभय दिले त्यांच्या संकटकाळात मदतीचा हात पुढे करणे हाच त्यामागचा खरा हेतू होता. त्यातूनच आर.आर.हांडे यांनी हा अहवाल उल्हास देबडवार, अतुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला. पुढे त्याचे काय झाले हे सर्वश्रृत आहेच. अहवालाबाबत वस्तुस्थिती सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट असतांना, इतकेच नाही तर नजरचुकीने अहवाल तयार केला अशी बेजबाबदार कबुली देबडवार आणि चौकडीने दिली असतांना या दोषी अभियंत्यांवर कारवाई का होत नाही हाच साबां वर्तुळाला पडलेला प्रश्न आहे. समीर भुजबळ यांच्यावर तपास यंत्रणेने कारवाईची सुरूवात केली. छगन भुजबळ, पंकज भुजबळ या आमदार पिता पुत्रांवरही कारवाईची तलवार टांगलेली आहे. मात्र अहवाल आणि त्याआधी झालेला घोटाळा या गैरकृत्यांना प्रत्यक्ष जबाबदार असलेल्या क्षेत्रीय अभियंत्यांच्या गंभीर दोषांकडे दुर्लक्ष का केले जाते हाच खरा सवाल आहे.
चल अचल संपत्ती शोधा
उल्हास देबडवार, अतुल चव्हाण, आर.आर.हांडे यांच्यासारख्या भ्रष्ट अभियंत्यांची नामी, बेनामी, चल अचल संपत्ती शोधल्यास वास्तव समोर येईल. या मंडळींना मिळणारा शासकीय पगार आणि त्यांचा होणारा खर्च याचा ताळेबंद मांडला तरी बरेच पुरावे हाती येतील. परदेश वार्या, अलिशान गाड्या, हवेल्या इतकेच नाही तर मुलामुलींचे विदेशात होणारे शिक्षण, लग्नांवर झालेला खर्च जावई बापूंवर उधळली गेलेली माया या सार्यांचाच हिशेब तपास यंत्रणेने नजरेसमोर ठेवावा अशीही मागणी होत आहे.