Breaking News

वसतिगृहाची मान्यता रद्द संदर्भात नोटीस

 अहमदनगर । प्रतिनिधी । 07 -  वसतिगृहातील वीजपंप जळण्यास विद्यार्थिनींना जबाबदार धरून त्याच्या दुरुस्तीसाठी पैशांची मागणी करत  विद्यार्थिनींना एक दिवस उपाशी ठेवण्यात आले होते. हा प्रकार शहरातील जानकीबाई आपटे बालिकाश्रम संस्थेत घडला होता. या प्रकरणी संबंधीत संस्थेला जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने नोटीस बजावली आहे. यात वसतिगृहाची मान्यता का रद्द करण्यात येवून नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. 
बुधवारी उघडकीस आलेल्या प्रकारानंतर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला  जाग आली. जानकीबाई आपटे बालिकाश्रम संस्थेच्या वसतिगृहातील वीजपंप जळाला होता. हा पंप येथील विद्यार्थिनींमुळे जळाला असून त्याच्या दुरुस्तीसाठी संस्थेचे सचिव डॉ. जयंत करंदीकर यांनी आमच्याकडे पैशाची मागणी केली असल्याची तक्रार बुधवारी विद्यार्थिनींनी केली होती. वीजपंप जळाल्याने संस्थेचे सचिव करंदीकर यांनी मुलींना सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी उपाशी ठेवले असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी केली आहे. 
समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांनी बुधवारी वसतिगृहात जाऊन संबंधीत विद्यार्थिनींचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे. येत्या आठ दिवसांत संस्थेने खुलासा करण्याचे आदेश दिले असून त्यात संस्थेची मान्यता रद्द करण्याचा इशारा दिला आहे.