स्काऊट गाईड चळवळीतून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार : आ. संग्राम जगताप
अहमदनगर । प्रतिनिधी । 07 - जगभरातील अडीचशेहून अधिक देशांत असलेली स्काऊट व गाईड चळवळ भारतातही चांगली रूजली आहे. नगर जिल्ह्यातही शहरी तसेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्काऊट गाईड उपक्रम राबविण्यात येत असून या माध्यमातून होणारे संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. या चळवळीच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. स्काऊटस् व गाईडस् जिल्हा कार्यालयाच्यावतीने आयोजित जिल्हा मेळावा सध्या मेहेराबाद येथे सुरू आहे. या मेळाव्याअंतर्गत शनिवारी सकाळी सहभागी विद्यार्थ्यांनी अरणगाव येथून भव्य शोभायात्रा काढली. या शोभायात्रेनंतर आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आ.जगताप बोलत होते.
याप्रसंगी महापौर अभिषेक कळमकर, आनंदराव शेळके, स्काउट व गाईडचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, जिल्हा मुख्य आयुक्त काशिनाथ बुचुडे, जिल्हा आयुक्त कैलास मोहिते, प्रा.उत्तमराव राजळे, संगिता लांडगे, आर.व्ही.पगारे, अनिता शिंदे, जी.जे.भोर आदी उपस्थित होते. आ.जगताप पुढे म्हणाले, स्काऊट व गाईडस् चळवळ खर्या अर्थाने वेगळी चळवळ असून ती ग्रामीण भागापर्यंत पोहचली आहे.
मेळाव्याच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी एकत्र येतात. यातून त्यांच्यातील कलागुणांना वार मिळण्याबरोबरच त्यांच्यात चांगले मूल्य रूजण्यास मदत होत आहे. प्रास्ताविक जिल्हा चिटणीस शरद दळवी यांनी केले. महापौर कळमकर म्हणाले, स्काउट गाईड चळवळीतून विद्यार्थ्यांना बंधूत्व तसेच राष्ट्रत्वाची शिकवण मिळते. निवासी मेळाव्यात सहभागी होणारे विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच राष्ट्रसेवेचे धडे त्यांना या माध्यमातून मिळत असल्याचे कळमकर यांनी सांगितले. संगीता रासकर यांनी सूत्रसंचालन केले. बी.बी.भोसले यांनी आभार मानले.
जिल्हा मेळाव्याचा समारोप रविवारी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.