पीएफ काढताना 60 टक्के रकमेवर टॅक्स
नवी दिल्ली, 01 - पीएफ काढताना आता तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. एक एप्रिल 2016 पासून पीएफ काढताना 60 टक्के रकमेवर टॅक्स वसूल केला जाईल.
2016-17 वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करताना अर्थमंत्री अरुण जेटलींनी याबाबत घोषणा केली. या निर्णयाचा फटका तब्बल 6 कोटी नोकरदारांना बसणार आहे. आतापर्यंत पाच वर्षांच्या सलग सेवाकाळानंतर ईपीएफ खात्यातून रक्कम काढताना कोणताही कर भरावा लागत नसे. पीएफमधून काढलेली 60 टक्के रक्कम ही तुमच्या त्या वर्षीच्या नियमित करपात्र उत्पन्नात जोडली जाईल. यामुळे तुमचे टॅक्स स्लॅब बदलू शकतात.
पुढील महिन्यापासून पीएफ खात्यामधून काढलेली 60 टक्के रक्कम टॅक्सेबल असेल, तर 40 टक्के रकमेवर सूट मिळेल. ईपीएफओ प्रमाणेच इतर मान्यताप्राप्त पीएफ स्कीममधून रक्कम काढतानाही 1 एप्रिल 2016 पासून हा नियम लागू होईल. नोकरदारांनी रिटायरमेंट फंडमध्ये आपले पैसे गुंतवून ठेवावेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचं या क्षेत्रातील जाणकार सांगतात. नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत दिल्या जाणार्या वार्षिक सेवा आणि ईपीएफओतर्फे कर्मचार्यांना दिल्या जाणार्या सेवेत सर्व्हिस टॅक्समधून सवलत देण्याची घोषणा करण्यात आली.