Breaking News

पर्यटन विभागाच्या ब्रँड अँबेसडर पदावरून अमिरला हटवले

नवी दिल्ली, 6 - पर्यटन विभागाचा ब्रँड अँबेसडर असलेल्या आमिर खानला पर्यटन मंत्रालयाने या पदावरून हटवले आहे. अमिरने नोव्हेंबर महिन्यात असहिसष्णुतेवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्या विरोधात देशभरातून संतापाच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर आपण देश सोडण्याचा विचार करूया असे पत्नी किरणने सुचवले होते असे वक्तव्य करून अनेकांच्या टीकेचा रोष पत्करावा लागलेल्या आमिरला हे विधान भलतेच महागात पडले आहे. देशातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयातर्फे चालवण्यात येणा-या ’अतुल्य भारत’ या कॅम्पेनच्या ब्रँड अँम्बेसडर पदावरून आमिरला काढण्यात आल्याचे वृत्त ’बिझनेस स्टँडर्ड’ने दिले आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना आमिरने असहिष्णूतेच्या मुद्यावर हे वक्तव्य केले होते. तसेच या घटनांच्या विरोधात सुरू असलेल्या पुरस्कार वापसीचेही त्याने समर्थन केले होते.  ’ या देशात काय घडतयं ते आम्ही रोज वृत्तपत्रातून वाचत असतो, पहात असतो. गेल्या काही महिन्यात देशात घडलेल्या घटनांबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत ते धक्कादायक आहेत. जे घडतयं, त्यामुळे मी चिंतित झालो, हे नाकबूल करणार नाही. विशेषत: गेल्या सहा ते आठ आठवड्यात देशातील असुरक्षितता, भय वाढले आहे’ असे आमिर म्हणाला होता. ’आपण भारत सोडूया का असा प्रश्‍न किरणने धास्तीपोटी मला विचारला होता. सभोवतालच्या वातावरणामुळे ती चिंतातुर झाली, मुलांची तिला काळजी वाटते. रोज पेपर उघडतानाही ती घाबरलेली असते. किरणने मला असा प्रश्‍न विचारणे माझ्यासाठी धक्कादायक होते, पण भोवती असलेल्या अस्वस्थतेचे ते द्योतक असल्याचे आमिर म्हणाला.