Breaking News

...आणि ओबामा रडू लागले


वॉशिंग्टन, 6 - अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांना व्हाईट हाऊसमध्ये एका भाषणादरम्यान रडू आले. ओबामा भाषणात  अमेरिकेतील गन कल्चरविरोधात बोलत होते. 
ओबामा यांनी भावूक होत देशातील गन कल्चर आता संपवले पाहिजे असे मत व्यक्त केले. तर या गन कल्चरमुळे शाळा-कॉलेजातल्या विद्यार्थ्यांचा नाहक बळी जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गन लॉबीमुळे ओबामा काँग्रेसमध्ये गन कल्चरवर लगाम कसण्यासाठी कायदा पास करू शकले नाहीत. गेल्या काही दिवसांत अमेरिकेत गोळीबाराच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे नातेवाईक या कार्यक्रमासाठी व्हाईच हाऊसमध्ये उपस्थित होते. मी प्रत्येकवेळी जेव्हा त्या मुलांचा विचार करतो तेव्हा मला त्या विचाराने वेडे व्हायला होते, असे सांगताना ओबामांच्या चेहर्‍यावरून अश्रू ओघळत होते. अमेरिकेमधील अनेक घरांमध्ये परवाना असलेल्या बंदुका आहेत. या कार्यक्रमात ओबामांनी अमेरिकेतील शस्त्रांच्या सहज उपलब्धतेविषयी चिंता व्यक्त केली. यावेळी ओबामांनी भविष्यात शस्त्र परवाने मिळविण्याचे नियम अधिक कडक करण्याविषयी सुतोवाचही केले. येत्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणूक होत आहे. त्यापूर्वी हा कायदा अंमलात आणला जाणार नसला तरी उर्वरित काळात नागरिकांकडून शस्त्रास्त्रांचा होणारा वाढता वापर रोखण्यासाठी प्रयत्न करू, असे ओबामा यांनी सांगितले. अमेरिकेत मागील काही वर्षात झालेल्या गोळीबारामध्ये तब्बल 10000 हून
अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.