Breaking News

प्रश्‍नांची उत्तरे देण्याची जबाबदारी देबडवारांचीच! -- सार्वजनिक बांधकाम : रहस्य 130 कोटींच्या कामांचे


 मुंबई/प्रतिनिधी । 6 - 130 कोटी रूपयांची कामे रद्द करण्याचा शहाजोगपणा दाखविणार्‍या अभियंत्यांनी ही कामे कुणी, कधी, कुणाच्या आदेशाने तयार केले अशा काही प्रश्‍नांची उत्तरे देणे बंधनकारक नाही का? असा सवाल साबांतून विचारला जात आहे.
यासंदर्भात लोकमंथन चमुला प्राप्त झालेली माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम विभागात एक टोळी कार्यरत असून वेगवेगळ्या कामांमध्ये अगदी सुरूवातीपासून घोळ निर्माण करणे, कामांची मंजूरी, अंदाजपत्रक, प्रशासकीय मंजूरी, निविदा काढणे, प्रसिध्दी देणे, मोजमाप करणे, कार्योत्तर मंजूरी देणे, बील मंजूर करणे, देयके अदा करणे या प्रत्येक टप्प्यावर ही टोळी चाणक्यनितीचा अवलंब करीत असल्यामुळे प्रत्येक कामात कुठला ना कुठला घोळ निर्माण होतो असा घोळ चव्हाट्यावर येणार नाही याचीही दक्षता ही टोळी घेते. आणि या टोळीचा म्होरक्या आपल्या अधिकारात घोटाळ्यास कारणीभूत ठरलेली कामे रद्द करून सारवासारव करतो. गेल्या काही वर्षांपासून साबांत ही प्रथाच पडली आहे. 2015 च्या अखेरीस एका स्मार्ट माध्यमाने प्रसिध्द केलेल्या वृत्तानंतर ही टोळी चर्चेत आली आहे. या स्मार्ट माध्यम वृत्तानुसार 130 कोटींची कामेच रद्दबातल ठरविण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. या वृत्ताचा हवाला देऊन सध्या सक्तीच्या रजेवर असलेले मुंबई साबां प्रादेशिक विभागाचे मुख्यअभियंता उल्हास देबडवार यांनीही सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक त्या 130 कोटींच्या कामांना उल्हास देबडवार हे साक्षीदार आहेत. या कामांचे सारे बाळंतपण त्यांच्याच अधिपत्याखाली झाले होते. याचाच अर्थ त्या कामांची सारी कुंडली देबडवार यांना ठाऊक असतांना स्मार्ट माध्यमाच्या वृत्तानंतर चौकशी केली जाईल अशी प्रतिक्रिया देऊन देबडवार नेमके काय साधू इच्छितात असा संभ्रम निर्माण होतो आहे. 
खरे तर त्या 130 कोटींच्या कामांना मंजूरी कुणी दिली? कुणाच्या आदेशावरून मंजूरी मिळाली? प्रशासकीय मंजूरी कुणी दिली? त्यासाठी कुणाचा आदेश पाळला गेला? या कामांचे अंदाजपत्रक कुणी तयार केले? हे 130 कोटींची  कामे ज्या शासकीय इमारतीत झाली. त्या शासकीय इमारतींचा उपभोग घेणार्‍या उपभोक्त्यांच्या पत्रानंतर या 130 कोटींच्या कामांचे सारे सोपस्कार पार पाडले गेलेत का? त्यानंतर अंदाजपत्रक तयार झाले? की त्यापूर्वीच... असे काही प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्या प्रश्‍नांची उत्तरे द्यायची तर कुणी द्यायची? मुख्य अभियंता म्हणून उल्हास देबडवार यांना या प्रश्‍नांची उत्तरे माहित नाहीत का? मग त्याची उत्तरे देण्याची नैतिक जबाबदारी देबडवार पार पाडणार आहेत की नाहीत हाच खरा सवाल आहे.