Breaking News

अजितदादा, जयंत पाटलांसह दिग्गजांवर 10 वर्ष राज्य बँक निवडणूकीस बंदी



मुंबई, 5 - राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव आडसूळ, जयंत पाटील यांच्यासह राज्यातील अनेक सहकारसम्राटांना दहा वर्षे बँकेची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या विभागाने हा निर्णय घेतल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब केल्याने अनेक नेत्यांना राज्य बँकेची निवडणूक लढविण्यास बंदी घातली गेली आहे. राजकीय द्वेषातून ही कारवाई केली नसल्याचे सांगत भ्रष्टाचारी संचालकांना राज्य बँकेवर ठेवले तर दिलेल्या कर्जाची वसुली कशी होईल असा सवाल चंद्रकात दादा पाटील यांनी उपस्थित केला आहे. राज्य सहकारी बँकेमध्ये तब्बल सुमारे दीड हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
दरम्यानच्या काळात राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बँकेच्या 77 माजी संचालकांवर आरोपपत्र ठेवण्यात आले होते. अजित पवारांवर कलम 88 नुसार नियमबाह्य कर्ज वाटप करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. अजित पवारांसोबत विजयसिंह मोहिते-पाटील, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, दिलीप सोपल, विजय वडेट्टीवार, माणिकराव कोकाटे, मधुकर चव्हाण, माणिकराव पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, राहुल मोटे, मीनाक्षी पाटील, जयप्रकाश दांडेकर, बाळासाहेब सरनाईक, पांडुरंग फुंडकर आदींसह 77 संचालकांवर पुढील 10 वर्षे बँकेची निवडणूक लढण्यास बंदी घातली आहे.