Breaking News

गुजरात काँग्रेसला धक्का काँग्रेस नेते महेंद्र सिंह वाघेलांचा भाजपमध्ये प्रवेश

गुजरात - माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांचे पुत्र आणि काँग्रेसचे माजी आमदार महेंद्र सिंह वाघेला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस आता उभारी घेऊ शकणार नाही असे वक्तव्यही त्यांनी प्रवेशावेळी केले. वाघेला यांचा भाजप प्रवेश गुजरात काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. गुजरातचे भाजप अध्यक्ष जीतू वाघानी आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या वर्षी मे महिन्यात शंकर सिंह वाघेला यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्विटर अनफॉलो केले होते. तेव्हापासून वाघेला भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होते. अशोक गहलोत यांना गुजरातचे काँग्रेस प्रभारी बनवल्यापासून शंकर सिंह वाघेला नाराज होते. यासर्व प्रकारानंतर आता शंकर सिंह वाघेला यांच्या मुलाने काँग्रेसला राम-राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुढल्या वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत याचा काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. गुजरातच्या राजकारणात बापू शंकर सिंह वाघेला आणि पंतप्रधान मोदी यांचे सलोख्याचे संबध राहिले आहेत. यापूर्वीही राज्यसभा निवडणुकीवेळी अहमद पटेल यांच्या विरोधात शंकर सिंह वाघेला आणि भाजपचे संबंध जुळल्याचे दिसून आले होते.