‘हिंदू पाकिस्तान’ प्रकरणी शशी थरूर यांना न्यायालयाचे समन्स
कोलकाता- काँग्रेस नेते शशी थरूर यांना हिंदू-पाकिस्तान यासंदर्भात केलेले वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. कोलकाता न्यायालयाने थरूर याच्यांविरोधात समन्स जारी केले आहे. येत्या 14 ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश बजाविले आहेत. वकील सुमीत चौधरी यांनी यासंदर्भात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. थरूर यांच्या विधानामुळे धार्मिक भावना दुखाविल्याचे तसेच संविधानाचा अनादर झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. केरळ प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी थरुर यांनी पाठराखण केली आहे. थरुर यांच्या विधानात कोणत्याही प्रकारची चूक नाही. त्यांनी एकप्रकारे इशारा दिल्याचे स्थानिक काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप विजयी झाला तर भारत ’हिंदू पाकिस्तान’ होण्याची परिस्थिती निर्माण होईल’, असे विधान थरुर यांनी केले होते. भाजप सत्तेत आल्यानंतर ते नवीन राज्यघटना लिहितील जे की नव्या राष्ट्राच्या अनुषंगाने पाकिस्तान सारखे असणार आहे. शिवाय, त्या देशात अल्पसंख्याकांचा सन्मान केला जाणार नाही, असेही थरुर यांनी म्हटले होते.