Breaking News

दखल गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का

देशात काँग्रेस लोकसभा निवडणुकीची तयारी करीत आहे. भाजप सरकारविरोधातील नाराजी कॅश करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मित्रपक्षांशी जागावाटप करून भाजपच्या विजयाचा रथ रोखण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दुसरीकडं काँग्रेसला निवडून आलेले लोकही सांभाळता येत नाहीत, असा अनुभव आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचं आणि पक्षश्रेष्ठींचंही ते अपयश आहे. कर्नाटकात भाजपला सत्तेपासून रोखण्यात राहुल गांधी व अन्य नेते यशस्वी झाले. त्यासाठी धर्मनिरपेक्ष जनता दलाला मुख्यमंत्रिपद दिले. काँग्रेसची ही खेळी यशस्वी झाली. आता सत्ता टिकविण्याची जबाबदारी धर्मनिरपेक्ष जनता दलाइतकीच काँग्रेसवरही आहे; परंतु माजी मुुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा धर्मनिरपेक्ष जनता दलावरचा राग अजूनही गेलेला दिसत नाही.
..................................................................................................................................................
सत्ता किती काळ टिकेल, अर्थसंकल्प मांडण्याआधीच ती कोसळेल, असं बेजबाबदारपणांचं वक्तव्य ते करीत आहेत. दोन्ही पक्षाच्या समन्वयकाची जबाबदारी त्यांच्याक डं असताना ते अशी विधान करून गोंधळ निर्माण करीत आहेत. भाजप काँग्रेसमधील त्रुटींचा फायदा घेण्यासाठी टपलेलाच आहे. भाजपला तशी संधी काँग्रेसच देत आहे. भाजपला लोक पर्याय शोधत असताना तसा पर्याय जनतेला दिसत नाही. त्यामुळं नाराज असूनही भाजपलाच मतं द्यावी लागतात. राहुल गांधी यांच्यात पोक्तपणा आल्याचं सांगितलं जात असलं, तरी अजूनही ते दरबारी राजकारणातून बाहेर आलेले नाहीत. त्यामुळं ज्यांना जनमाणसांत स्थान आहे, ती माणसं पक्ष सोडून जात  आहेत. हिमाचल प्रदेशात, आसाममध्ये तेच घडलं. आता गुजरातमध्येही तेच घडलं. पक्ष सोडण्याआधी नेते आपल्याला भेटायला येतात, त्यांच्या व्यथा सांगतात. त्या ऐकून काही सुधारणा करता येत असतील, तर त्या करणं अपेक्षित असताना तसं होत नाही. उलट, संंबंधितांचं म्हणणं ऐकल्यानंतर त्याची समजूत काढण्याऐवजी त्याचं म्हणणं दुर्लक्षित केलं, तर संबंधित बाहेरचा रस्ता धरतात. काँग्रेस आणखी खिळखिळी करण्यासाठी भाजप टपूनच बसलेला आहे. गुजरातमध्ये भाजपला पूर्वीइतक्या जागा मिळू न देण्याचा चंग बांधलेल्या काँग्रेसला स्वतः चे आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी सांभाळता येत नसतील, तर ते त्या पक्षाचं अपयश आहे.
गुजरातमधील काँग्रेस नेते कुवरजी बवालिया यांनी मंगळवारी काँग्रेसचा हात सोडून भाजपत प्रवेश केला. राहुल गांधी हे मतांसाठी जातीय राजकारण करतात अशी टीका करत त्यांनी भाजपत प्रवेश केला असून त्यांना विजय रुपाणी यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. बवालिया यांनी मंगळवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे राजीनामा सोपवल्यानंतर बवालिया हे भाजपच्या प्रदेश कार्यालयात पोहोचले. तिथं त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. बवालिया हे चार वेळा आमदार राहिले असून सध्या ते राजकोट जिल्ह्यातील जसदान मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2009 मध्ये ते लोकसभेवरही निवडून गेले होते. बवालिया हे गुजरातमधील कोळी समाजातील नेते असून गुजरातच्या 6 कोटींच्या लोकसंख्येत कोळी समाजाचे प्रमाण 22 टक्के आहे. या समाजात बवालिया यांचा दबदबा आहे. सुमारे सव्वा कोटी लोकसंख्येत ज्यांचे पाठिराखे आहेत, ज्यांना जनाधार आहे, अशा नेत्याला काँग्रेसनं जपायला हवं होतं. पुरुषोत्तम सोलंकी भाजपला वारंवार ब्लॅकमेल करीत होते. आता त्यांना पर्याय भाजपनं शोधला आहे. बवालिया यांनी 15 दिवसांपूर्वी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या कामकाजाविरोधात त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारीदेखील केल्या होत्या. मात्र, यानंतर पक्षाक डून बवालिया यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. शंकरसिंह वाघेला यांच्याबाबतीतही गांधी यांनी तसंच केलं. कदाचित वाघेला काँग्रेसमध्ये राहिले असते, तर आणखी दहा-बारा आमदार निवडून आणून भाजपला सत्तेपासून दूर ठेवता आलं असतं; परंतु बेरजेच्या राजकारणात काँग्रेस कमी पडते. त्याचा फायदा भाजप अचूकपणे उठवितो. राहुल गांधी हे मतांसाठी जातीय राजकारण करतात. त्यामुळं मला मतदारसंघात काम करणं अशक्य झालं. माझा नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर विश्‍वास असून तेच देशाचा विकास करतील, असं त्यांनी सांगितलं.
2009 मधील लोकसभा निवडणुकीत बवालिया राजकोटमधून खासदार म्हणून निवडून आले होते. बवालिया हे तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क असलेले नेते असून त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढेल, असं भाजपनं म्हटलं आहे. बवालिया यांच्यापूर्वी जावीद पिरझादा आणि विक्रम मडाम या दोन काँग्रेस आमदारांनीही पक्षातील कार्यप्रणालीवर जाहीरपणे आहे. गुजरातच्या जनतेनं गेल्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत दिलेल्या पंचायत समित्या व जिल्हा परिषदाही काँग्रेसला टिक विता आल्या नाहीत. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत शहरी भागात भाजपनं स्थान राखलं असलं, तरी ग्रामीण भागात मात्र काँग्रेसनं मोठी झेप घेतली होती. काँग्रेसनं 31 पैकी 23 जिल्हा परिषदा जिंकल्या होत्या. अडीच वर्षानंतर झालेल्या पदाधिकारी निवडीत भाजपनं काँग्रेसकडून पाच जिल्हा परिषदा हिसकावून घेतल्या आहेत. आता काँग्रेसकडं 18 व भाजपकडं 12 जिल्हा परिषदा आहेत. 239 पंचायत समित्यांपैकी काँग्रेसनं 146 पंचायत समित्या जिंकल्या होत्या. मात्र, आता त्यातील तीस पंचायत समित्या भाजपनं काँग्रेसकडून हिसकावून घेतल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पदाधिकार्‍यांना राजस्थानमध्ये नेऊनही या पदाधिकार्‍यांना गळाला लावण्यात भाजपला यश आलं. आता काँग्रेसकडं 132 व भाजपकडं 73 पंचायत समित्या आल्या आहेत. गेल्या अडीच वर्षांपूर्वी जे कमावलं, ते पदाधिकारी निवडीत घालविल्यामुळं काँग्रेसलाही हा धोक्याचा इशारा असल्याचं मानलं जातं.
--------------------------------------