Breaking News

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा 5 जुलैला शहरात जिल्हाव्यापी मोर्चा पेन्शनवाढीसह विविध मागण्या

अहमदनगर (प्रतिनिधी)- पेन्शनवाढीसह सेवा निवृत्त कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना, राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना व ईपीएस 95 समन्वय समितीच्या वतीने गुरुवार दि.5 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व निवृत्त कर्मचारी सहभागी होणार असून, जास्तीत जास्त संख्येने पेन्शनधारकांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन कॉ.आनंदराव वायकर, सुभाष कुलकर्णी, रमेश गवळी यांनी केले आहे.
निवृत्त कर्मचार्‍यांना दरमहा 9 हजार पेन्शनसह केंद्रीय कर्मचार्‍यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा, खासदार भगतसिंग कोशियारी समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी व्हावी, सर्व सेवानिवृत्तांना दर्जेदार व मोफत वैद्यकिय सुविधा उपलब्ध करावी, अन्नसुरक्षा कायदा लागू करावा, सन 1995 च्या पेन्शन कायद्यात दुरुस्त्या करुन सुत्रात बदल करण्यात यावा, अन्य कारणाने उद्योगधंदा बंद पडल्यास अथवा वयाच्या 58 पूर्वी निवृत्ती घेतलेल्या कर्मचार्‍यांना पेन्शन देण्यात येण्याची प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाला टिळकरोड येथील श्रमिक कार्यालयापासून सकाळी 11 वा. प्रारंभ होवून, शहराच्या प्रमुख मार्गावरुन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. यामध्ये साखर कामगार, एस.टी. महामंडळ, शेती महामंडळ, औद्योगिक, एमएसईबी, सहकारी बँका, पतसंस्था, सुतगिरणी, दूधडेअरी, रुग्णालय व अन्य सर्व उद्योगातील कामगार सहभागी होणार आहेत.